घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच मोकळेपणे व्यक्त झाला स्वप्निल; म्हणाला “तिसऱ्या व्यक्तीला कधीच..”
अभिनेता स्वप्निल जोशीने मराठी सिनेसृष्टीत विविध भूमिका साकारत चाहत्यांची मनं जिंकली आहेत. स्वप्निलचं प्रोफेशनल आयुष्य अनेकांना माहीत असलं तरी त्याच्या खासगी आयुष्याविषयी फार क्वचित लोकांना माहिती असेल. स्वप्निल त्याच्या खासगी आयुष्याविषयी फारसा मोकळेपणे व्यक्त होत नाही. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या घटस्फोटाविषयी आणि लग्नाविषयी सांगितलं. त्याचप्रमाणे घटस्फोटानंतर माध्यमांनी आणि पत्रकारांनी कशा पद्धतीने त्याच्या खासगी आयुष्याच आदर केला, याविषयीही तो व्यक्त झाला.
एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत स्वप्निल म्हणाला, “कॉलेजमध्ये अकरावी-बारावीला असताना माझं एक अफेअर होतं. त्या नात्याबद्दल मी बऱ्यापैकी गंभीर होतो. पण काही कारणास्तव ते नातं फार काळ टिकू शकलं नाही. आमचं भविष्य एकत्र नाही हे समजल्यावर आम्हाला खूप दु:खही झालं होतं. पण त्यानंतर पुन्हा काही वर्षांनी दुसरं अफेअर झालं. मग लग्न झालं. पहिल्या लग्नानंतर चार-पाच वर्षांनी घटस्फोट झाला. त्यानंतर दुसरं लग्न केलं. आता बायको आणि दोन मुलं असा सुखी संसार सुरू आहे.”
घटस्फोटाविषयी स्वप्निल पुढे म्हणाला, “ज्यावेळी मी माझ्या पहिल्या पत्नीपासून विभक्त झालो, तेव्हा सोशल मीडिया हा प्रकार नव्हता. तेव्हा प्रिंट आणि टीव्ही मीडिया होतं. पण ही गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो की त्यावेळी प्रिंटमधील एकाही पत्रकाराने माझी बातमी छापली नाही. मला अनेक पत्रकार मित्रांचे फोन आले. आम्हाला तुझ्याविषयीची बातमी समजली, पण आम्ही ते छापणा नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. कारण ही मराठी पत्रकारितेची संस्कृती नाही, असं ते म्हणाले. त्यामुळे तेव्हा एकाही पत्रकाराने वृत्तपत्रात माझ्या घटस्फोटाबद्दलची एकही बातमी छापली नव्हती. आज ती गोष्ट मी अभिमानानं सांगू शकतोय.”
सध्या सोशल मीडियामुळे सगळी गणितं बदलली आहेत. सेलिब्रिटींच्या आयुष्यातील छोट्यातली छोटी गोष्ट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांपर्यंत पोहोचते. “अनेकदा हे खरं आहे की नाही हेसुद्धा तपासून पाहिलं जात नाही. पूर्वी तथ्यांची पडताळणी केली जायची, परंतु आता सगळ्यात आधी कोण बातमी ब्रेक करणार ही स्पर्धा निर्माण झाली आहे. दोन लोकांचा घटस्फोट हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण त्यावेळी ते जोडपं अनेक यातनेतून जात असतं. त्याच कोण चुकीचं, कोण बरोबर हे आपण ठरवू शकत नाही. कारण तिसऱ्या माणसाला कधीच काही माहीत नसतं”, असं मत स्वप्निलने मांडलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List