मुंबईच्या रस्त्यांची दोनदा स्वच्छता होणार, कचरा उचलण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर
मुंबईतील सुमारे 2 हजार 800 किलोमीटर लांबींच्या रस्त्यांची दिवसातून दोन वेळा स्वच्छता (सेकंड स्वीपिंग) करण्यात येणार आहे. या कामासाठी अधिक आणि अनुभवी मनुष्यबळाची गरज असल्याने सफाई कर्मचाऱयांच्या कामांचे फेरनियोजन केले जाणार असून मोटर लोडर कामगारांची नेमणूक करण्यात येणार आहे. दरम्यान, कचरा गोळा करून तो वाहून नेण्यासाठी एकच यंत्रणा काम करणार असून नवीन जास्त क्षमतेची आकर्षक वाहने वापरण्यात येणार आहेत. एकूण वाहनांपैकी सुमारे 10 ते 15 टक्के वाहने इलेक्ट्रिक स्वरूपाची असतील.
मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर अधिक प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण घनकचरा व्यवस्थापन सेवा देण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेकडून सेवाधारीत (सर्व्हिस बेस्ड) कंत्राट देण्यात येणार आहे.
सेवाधारित कंत्राटांमुळे 25 टक्के आर्थिक बचत
सेवाधारीत (सर्व्हिस बेस्ड) कंत्राटामध्ये कचरा संकलन करून वाहून नेण्यासाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा कंत्राटदारांची असते तर, कार्याधारित (हायरिंग बेस्ड) कंत्राटामध्ये केवळ वाहनेच कंत्राटदारांची असतात आणि इतर सर्व यंत्रणा महापालिकेची असते. भाडेतत्त्वाधारीत (हायरिंग बेस्ड) कंत्राटाच्या तुलनेत सेवाधारीत (सर्व्हिस बेस्ड) कंत्राटात सुमारे 25 टक्के कमी खर्च येत असल्याने आर्थिकदृष्ट्या ही सेवा परवडणारी आहे. महापालिकेने एल, एम (पूर्व) आणि एम (पस्चिम) वगळता इतर सर्व प्रशासकीय विभागांमध्ये सेवाधारीत (सर्व्हिस बेस्ड) कंत्राट देण्यात येणार आहे, अशी माहिती जोशी यांनी दिली.
स्वतंत्र कॉल सेंटर
तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कॉल सेंटर कार्यान्वित केले जाणार आहे. प्रस्तावित योजनेमुळे मोटर लोडर कामगारांचे हक्क बाधित होणार नाहीत अथवा त्यांचे आर्थिक नुकसानही होणार नाही. कोणतेही यानगृह (गॅरेज) बंद केले जाणार नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List