Operation Sindoor च्या एअरस्ट्राईचे पुरावे मागण्याची गरज नाही, संजय राऊत यांचे विधान
कुठलाही राजकीय पक्ष किंवा नेता या ऑपरेशन सिंदूरचे राजकीय श्रेय घेऊ पाहत असेल तर तुम्ही पहलगाममध्ये मृत्यू पावलेल्या वक्तींवर अन्याय करत आहात असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच या एअरस्ट्राईकचे पुरावे मागण्याची गरज नाही असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, पहलगाममध्ये बहिणींचं सिंदूर दहशतवाद्यांनी पुसलं होतं. आणि आमच्या धर्मात कुंकुवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर कुणाचं कुंकू पुसलं जात असेल तर आम्ही सहन नाही करू शकत. त्यामुळे या मोहीमेचं नाव सिंदुरच्या नावाने असेल तर ही चांगली बाब आहे. आमच्या ज्या बहीणींचं कुंकू पुसलं त्यांच्यासाठी ही गर्वाची बाब आहे की बदला पूर्ण झाला. कुठल्या देशाने पाठिंबा दिला यात मी जात नाही, हिंदुस्थानी लष्कराने ही कारवाई केली. अमेरिका इथे येऊन लढणार नाहिये ना पुतीन यांच्या फौजा इथे येणार आहेत. आपल्याच फौजांना आपलं आणि देशाचं रक्षण करायचे आहे. आपले हिंदुस्थानी सैन्य सक्षम आहे आणि आपल्या हिंदुस्थानी फौजांमध्ये तो जोश आणि ताकद आहे तो देशाच्या शत्रूंना मातीत मिसळू शकतो जे त्यांनी आज केले. पाकिस्तानवर कशी कारवाई करावी याची पंतप्रधान मोदींनी तीनही दलाच्या प्रमुखांकडे दिली होती. त्यामुळे रात्री कोण कुठे मॉनिटरिंग करत होतं यात न पडलेलं बरं असे संजय राऊत म्हणाले.
पाकिस्तानवर अशी एखादी कारवाई व्हावी असा संपूर्ण देशाचा दबाव होता. पहलगाममध्ये ज्या प्रकारे हल्ला झाला, हा हल्ला म्हणजे हिंदुस्थानी सैन्याला दिलेले एक आव्हान होतं. जम्मू कश्मीर हा केंद्रशासित प्रदेश असून तिथल्या सीमेवर आणि राज्यातही सैन्य उभं असतं. ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यावरून पाकिस्तानने एक मोठी चूक केली, त्यांनी आमच्या हिंदुस्थानी सैन्याला आव्हान दिलं. जर हिंदुस्थानी सैन्याला कुणी आव्हान देत असेल तर आपल्या फौजा शांत नाही बसणार.
तसेच यात राजकारणाबाबत चर्चा होता कामा नये. पुलवामा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकारण केलं. आम्ही त्यांना इशारा देतोय की. देशही पाहतोय की हे लोक किती राजकारण करू शकतात. या कारवाईचे संपूर्ण श्रेय हिंदुस्थानी लष्कराचे आहे. कुठलाही राजकीय पक्ष किंवा नेता या कारवाईचे राजकीय श्रेय घेऊ पाहत असेल तर तुम्ही पहलगाममध्ये मृत्यू पावलेल्या वक्तींवर अन्याय करत आहात.
सैन्य, हवाई दल आणि नौदलाला सॅल्यूट करावा अशी कारवाई त्यांनी केली आहे. अशा प्रकारची कारवाई पहाटे हिंदुस्थानीसेनेने केली आहे. हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा तळावर एअर स्ट्राईक केला आहे. आता याचे पुरावे मागण्याची गरज नाही. सैन्याचं जे लक्ष्य होतं ते त्यांनी साधलं आहे असे संजय राऊत म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर ही फक्त सुरूवात आहे. हिंदुस्थानी सैन्याचा स्वातंत्र्यानंतर इतिहास पाहिला तर त्यांची कुठलीही कारवाई ही उथळ नाही. हिंदुस्थानी सेना ही अभ्यासू आणि संयमी सेना आहे. हिंदुस्थानी सेना योग्य वेळी योग्य पावलं टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. जगातल्या नामवंत सैन्यात हिंदुस्थानी सैन्याची गणना होते, त्यामुळे हिंदुस्थानी सेना जे करतं ते योग्य करतं.
या कारवाईचे कुणी राजकीय श्रेय घेत असेल तर ते 26 मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करत आहेत. पुलवामा प्रकरणात आरोप झाला की, लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी हे तुम्हीच घडवलं का? अशा प्रकारचे आरोप आणि संशय निर्माण होऊ नये असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी या सगळ्या कारवाईचे श्रेय घेऊ नये. जे या कारवाईचे श्रेय घेत असेल तर पहलगाम हल्ल्यात मृतांचीही जबाबदारी घ्यावी लागेल.
संपूर्ण देशात आता मॉकड्रील होणार आहे. पण अनेक ठिकाणी सायरन बिघडले आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. जनतेचा तशी युद्धसरावाची गरज नाहीये. हिंदुस्थानी जनता मानसिकदृष्ट्या सक्षम आहे. हिंदुस्थानी जनतेने तीन युद्ध पाहिलेली आहेत. पिढ्या जरी बदलत असल्या तरी भारतीय जनतेच्या नशिबी ही युद्ध आहे. मॉकड्रीलच्या माध्यमातून फक्त लोकांना मार्गदर्शन करणे गरजेचं असतं. दुर्दैवाने शत्रू राष्ट्राने आपल्यावर हल्ला केला तर आपण त्यासाठी कसं तयार असलं पाहिजे याचे मार्गदर्शन असतं. आता आम्ही काय बंकर्स वगैरे काय काढलेले नाहीयेत. बंकर्स हे पंतप्रधानांसाठी असतात. जनतेला स्वतःचं रक्षण स्वतःच करावं लागतं.
सर्वात आधी पंतप्रधान मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्यायला हवा होता. हे मी वारंवार सांगतोय. 26 महिलांचं कुंकू पुसलं गेलं यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. त्यांचा राजीनामा मोदींनी घेतला असतं तर मोदींनी काहीतरी करून दाखवलं असं आपण म्हटलं असतं. आता हिंदुस्थानी सैन्यावर जबाबादारी दिल्यावर सैन्याने ही कामगिरी करून दाखवली. राज्यकर्ते सीमेवर जाऊन बसत नाहीत. राज्यकर्ते कारवाईचे आदेश देतात. आणि सैन्य सक्षम असेल तर करून दाखवतो. याचे श्रेय राजकारण्यांनी घेऊ नये असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List