लाडक्या बहिणींवर भाईगिरी – सामनातून सरकारवर टीकेचे आसूड

लाडक्या बहिणींवर भाईगिरी – सामनातून सरकारवर टीकेचे आसूड

महायुती सरकारची बहुचर्चित “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” ही जाहीर झाल्यापासूनच चर्चेत असून विरोधकांनी त्यावरून आत्तापर्यंत सरकारवर असंख्य वेळा टीका केली आहे. या योजनेवरून सरकारला धारेवरही धरण्यात आलं आहे. मात्र सरकारमधील नेत्यांनी विरोधकांना पुरून उरत या योजनेची पाठराखण केली आहे. पण आता या योजनेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली असून लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाखांपर्यंत पोहोचली आहे. यापूर्वी 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती. आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सरकारच्या 954 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचेही समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या “सामना”मधून सरकारवर टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत.

निवडणुका संपल्यावर सरकार नावाचा बदमाष भाऊ निकष व नियमांचा चाबूक घेऊन ‘लाडकी बहीण’ योजनेवर तुटून पडला आहे. आपल्याच योजनेचे पोस्टमॉर्टम करून लाडक्या बहिणींची संख्या दर महिन्याला कमी केली जात आहे. सरकारची ही ‘भाईगिरी’ महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी बघत आहेत ना? असा खडा सवाल सामनामधून विचारण्यात आला आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मिंधे मंडळ व भाजप महायुतीने सुरू केलेली ‘लाडकी बहीण’ योजना म्हणजे ‘कॅश फॉर व्होट’चाच प्रकार होता, असा दावाही अग्रलेखातून करण्यात आला आहे.

गरज सरो आणि…

सामनाच्या अग्रलेखातून लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर कडाडून टीका करण्यात आली आहे. नेमकं काय म्हटलं आहे अग्रलेखात ते जाणून घेऊया. सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा…

‘गरज सरो आणि वैद्य मरो’ हा राजकारण्यांचा सर्वात आवडता मंत्र आहे. महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिला सध्या याच मंत्राचा कटू अनुभव घेत आहेत. निवडणुकीपूर्वी आपणच आणलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेची आता निवडणुकीनंतर तेच सरकार कत्तल करीत सुटले आहे. दरमहा 1500 रुपयांचे आमिष दाखवून निवडणुका जिंकल्यानंतर सरकारी भाऊरायांच्या मनातील बहिणीविषयी असलेल्या प्रेमाला ओहोटी लागली आहे व हेच सरकार आता नियमांचे दंडुके उगारून ‘भाईगिरी’वर उतरले आहे. नवे निकष आणि नियम लादून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची संख्या दर महिन्याला कमी करण्याचा सपाटाच सरकारने लावला आहे. गेल्या दीड महिन्यात ‘लाडकी बहीण’ योजनेतून पाच लाख महिलांची नावे वगळण्यात आल्यानंतर आता आणखी चार लाख महिलांना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. तब्बल नऊ लाख महिलांना अपात्र ठरवून त्यांची नावे योजनेतून बाद करण्यात आल्यामुळे सरकारी तिजोरीवरील मोठाच भार हलका झाला आहे, असे सांगण्यात येते. नऊ लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढल्यानंतर सरकारचे तब्बल 945 कोटी रुपये वाचले आहेत. शिवाय लाडक्या बहिणींची उपयोगिता किमान पाच वर्षांसाठी तरी संपल्यामुळे योजनेतून आणखी किती महिलांची नावे कमी करता येतील, त्यासाठी कोणते नवीन नियम किंवा जाचक अटी शोधून काढता येतील यासाठी सरकारमधील ‘भाऊराय’च कामाला लागले आहेत, असा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.

सरकारने उत्तर द्यायला हवं

ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे, त्यांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहे. योजनेतील लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे की नाही हे तपासण्यासाठी सरकार थेट इन्कम टॅक्स विभागाची मदत घेणार आहे. याशिवाय अनेक महिलांच्या अर्जांची फेरतपासणी केली जात आहे. अपात्र ठरवलेल्या महिलांना गेल्या सहा महिन्यांचे जे पैसे देण्यात आले ते परत घेणार नाही, अशी उपकाराची भाषा सरकार वापरत आहे. मात्र योजना जाहीर करतानाच हे नियम, निकष व अटी सरकारने का घातल्या नाहीत व निवडणुका संपल्यावरच लाभार्थी महिलांचा फेरआढावा घेण्याचे कारण काय याचे उत्तर आता सरकारने द्यायला हवे अशी मागणी लेखातून करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची मते खेचण्यासाठीच ‘लाडकी बहीण’ योजना आणली

प्राप्त माहितीनुसार येत्या काही दिवसांत लाभार्थी महिलांची संख्या 15 लाखांपर्यंत कमी करण्याचे व टप्प्याटप्प्याने या योजनेतील लाभार्थी महिलांची आणखी छाटणी करण्याचे प्रयत्न सरकार पातळीवर सुरू आहेत. आजघडीला महाराष्ट्र सरकारवर सुमारे 8 लाख कोटींचे कर्ज आहे. या कर्जाचे व्याज फेडतानाच सरकारची दमछाक होत असताना केवळ महिला मतदारांची मते खेचण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना आणली होती, असा दावाही सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे.

या योजनेच्या वार्षिक 46 हजार कोटींच्या खर्चामुळे महाराष्ट्र सरकारची अर्थव्यवस्थाच कोमात गेली आहे. सरकारकडे आरोग्य योजनांसाठी पैसे शिल्लक नाहीत. गरीब रुग्णांसाठी असलेल्या योजनांची खासगी रुग्णालयांची शेकडो कोटींची बिले थकली आहेत. शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर करण्यात आलेले पैसे देण्यासाठीही सरकारकडे निधी उरलेला नाही. राज्यातील तमाम कंत्राटदारांची बिलेही थकली आहेत. विकासाची सर्व कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे सरकार भानावर आले आहे. बहिणींच्या मतांचा वापर करून सत्तेचा स्वार्थ साधल्यानंतर सरकारने पहिली कुऱ्हाड चालवली ती या ‘लाडकी बहीण’ योजनेवरच. सरकारचे प्रमुख मान्य करोत अथवा ना करो, मात्र गेल्या दोन-अडीच वर्षांतील अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार व सरकारी तिजोरीची मुक्तहस्ते केलेली लूट यामुळे महाराष्ट्र सरकार गंभीर स्वरूपाच्या आर्थिक संकटात सापडले आहे. या संकटातून सावरण्यासाठीच सरकारने आता प्रचंड गाजावाजा करून आणलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचे पंख छाटायला सुरुवात केल्याची टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;