‘बोरिवली ही धर्मशाळा नाही जिथे बाहेरचा माणूस….’; गोपाळ शेट्टी यांनी भाजपला सुनावलं
भाजपकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बोरिवली विधानसभा मतदारसंघाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील राणे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. सुनील राणे यांचं तिकीट कापून भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण भाजपकडून गोपाळ शेट्टी यांनादेखील संधी देण्यात आलेली नाही. याऐवजी भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केल्याने गोपाळ शेट्टी नाराज झाले आहेत. गोपाळ शेट्टी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना आपली नाराजी व्यक्त केली आहे.
बोरिवली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत पक्षाने जो निर्णय घेतला त्यावर गोपाळ शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. “बोरिवली ही धर्मशाळा नाही जिथे कोणी बाहेरचा माणूस येऊन निवडणूक लढवेल. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत आमच्याबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, मग तो नेता असला तरी. मी पक्षाच्या आदेशाचे पालन करेन. मला नुकतीच माहिती मिळाली आहे की, मी कार्यकर्त्यांमध्ये जाईन, त्यांची इच्छा असेल तर लढा सुरूच ठेवणार”, असं सूचक वक्तव्य गोपाळ शेट्टी यांनी केलं आहे. “आधी विनोद तावडे यांना बोरिवलीत आणले, त्यानंतर सुनील राणे यांना दिले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उत्तर मुंबईतून लोकसभेचे तिकीट दिले. मी त्यांच्यासाठी काम केले, बोरिवली ही धर्मशाळा नाही”, असं रोखठोक मत गोपाळ शेट्टी यांनी मांडलं आहे.
याआधी गोपाळ शेट्टी यांचं लोकसभेचं तिकीट कापलं
भाजपने याआधी सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांचं खासदारकीचं तिकीट कापलं होतं. उत्तर मुंबई मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. इथे मराठी आणि गुजराती मतदार सर्वाधिक आहेत. या मतदारांकडून भाजपला सर्वाधिक मतदान केलं जातं. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला बनला आहे. या मतदारसंघात गोपाळ शेट्टी 10 वर्ष खासदार राहिले आहेत. ते या मतदारसंघाच्या गल्लोगल्लीपर्यंत पोहोचले आहेत. त्यांचं मतदारसंघात मोठं काम आणि नाव देखील आहे. पण लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी गोपाळ शेट्टी यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. त्यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली होती.
पीयूष गोयल यांना उमेदवारी दिल्यानंतर गोपाळ शेट्टी नाराज झाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले होते. त्यात त्यांना यशदेखील आलं होतं. यानंतर गोपाळ शेट्टी यांनी पीयूष गोयल यांच्यासाठी प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत बोरिवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. पण ऐनवेळी संजय उपाध्याय यांचं नाव जाहीर झालं आहे. त्यामुळे गोपाळ शेट्टी कमालीचे नाराज झाले आहेत. यानंतर आता गोपाळ शेट्टी काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List