आरोपींकडे 28 जीवंत काडतुसे, त्यांचा पुढचा टार्गेट कोण? सरकारी वकिलांची कोर्टात महत्त्वाची माहिती
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रसेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. यापैकी एक आरोपी हा उत्तर प्रदेशातील बहराई येथील रहिवासी आहे. तो 19 वर्षांचा असून त्याचं नाव धर्मराव राजेश कश्यप, दुसरा हरियाणाच्या कैथल इथला रहिवासी आहे. तो 23 वर्षांचा असून त्याचं नाव गुरमैल बलजित सिंह असं आहे. या दोन्ही आरोपींची आज वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना मुंबईच्या किला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकील गौतम गायकवाड यांनी पोलिसांच्या बाजूने युक्तिवाद केला. तर वकील सिद्धार्थ आगरवाल यांनी आरोपींच्या बाजूने युक्तिवाद केला. यावेळी सरकारी वकील गौतम गायकवाड यांनी आरोपींच्या 14 दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. तसेच आरोपींकडे तब्बल 28 काडतुसे सापडल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. आरोपींच्या वकिलांनीदेखील यावेळी युक्तिवाद केला. पण तो युक्तिवाद सरकारी वकिलांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला.
“आरोपींकडे तब्बल 28 जिवंत काडतुसे सापडली आहेत. आरोपी ही हत्या करून शांत बसणार होते की आणखी कोणाची हत्या करायची होती हे तपासायचे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा तपास करावा लागणार आहे. आम्हाला अनेक बाबी तपासायच्या आहेत. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. आणखी कोण यांच्या निशाण्यावर आहेत का हे तपासायचं आहे. आरोपीना बंदूक पुरवणारे कोण आहेत, त्यांना फंडिंग कोणी केलेली आहे हे आम्हाला तपासायचे आहे”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी यावेळी केला.
“आम्ही फरार आरोपींच्या शोधासाठी १०-१० टीम केलेल्या आहेत. नियोजित हत्या आणि रेकी करणे, शस्त्र चालवण्याच प्रशिक्षण अशा अनेक बाबी स्पष्ट आहेत. आरोपी साधेसुधे नाहीत. त्यांनी पूर्ण प्रशिक्षण घेऊन नियोजित पद्धतीने ही हत्या केलेली आहे. आम्हाला जस्तीत जास्त पोलीस कोठडी मिळाल्यास आम्ही योग्य दिशेने तपास करू शकतो”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी यावेळी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List