मोठी बातमी ! रतन टाटा यांना भारतरत्न द्या, राज्यमंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर

मोठी बातमी ! रतन टाटा यांना भारतरत्न द्या, राज्यमंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर

Ratan Tata Bharat Ratna Award : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस हरपला, अशी प्रतिक्रिया सध्या सर्वत्र उमटताना दिसत आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा, अशी मागणी विविध स्तरावरुन होत आहे. आता राज्य मंत्रिमंडळात रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

या शोकप्रस्तावात एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे.

देशाची पुन्हा उभारणीत टाटा समूहाचा वाटा सिंहाचा

टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समूहाचा कारभार अनेक वर्ष पाहिला. देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिलं. टाटा यांनी नैतिक मूल्यांची जी जपणूक केली, ती इतर उद्योजकांसाठी आणि उद्योगविश्वातील भावी पिढ्यांसाठीही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतील. ते तत्त्वनिष्ठ कर्मयोगी होते. स्वातंत्र्यानंतर देशाची पुन्हा उभारणीत टाटा समूहाचा वाटा सिंहाचा होता. या समूहाच्या माध्यमातून रतन टाटा यांनी भारताचा झेंडा जागतिक पातळीवर दिमाखाने फडकता ठेवला, असेही एकनाथ शिंदेंनी शोक प्रस्तावात म्हटले.

मोटारीपासून मिठापर्यंत आणि कंप्युटरपासून कॉफी-चहापर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानाने जोडले जाते. शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी आपले अनन्यसाधारण योगदान दिले. मुंबईवर झालेल्या २६ / ११ च्या हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा स्मरणात राहणार आहे. कोविड काळात रतन टाटा यांनी पीएम रिलीफ फंडाला तत्काळ 1500 कोटी रुपये दिले. तसेच कोविड काळात रुग्णांसाठी त्यांची बहुतांश हॉटेलही उपलब्ध करून दिली. हा त्यांचा मोठेपणा कायम लक्षात राहणारा आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान

नवनिर्मिती आणि दानशूरता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठायी होता. त्यांनी कधीही आपल्या ‘टाटा मूल्यां’ शी तडजोड केली नाही. तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी त्यांनी इनोव्हेशन सेंटर सुरू केलं.

महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘उद्योग रत्न’ हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा महाराष्ट्राला सदैव झाला. रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रिमंडळ सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, ही प्रार्थना. देशाच्या या महान सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळाकडून भावपूर्ण श्रद्धांजली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;