Akshay Shinde Encounter Hearing : तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारी वकिलांना घेतलं फैलावर

Akshay Shinde Encounter Hearing : तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारी वकिलांना घेतलं फैलावर

Akshay Shinde Encounter Hearing : बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागली आणि त्यानंतर अती रक्तस्त्राव झाला, असे त्याच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी हायकोर्टात धाव घेत याप्रकरणी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली.

मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी होत आहे. यावेळी सरकारी वकील हितेन वेणूगावकर यांनी कोर्टात सरकारची बाजू मांडली. याप्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे दिला आहे. त्यांची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. यावर कोर्टाने सीआयडीचा तपास कधी पूर्ण होणार याची माहिती द्या, असे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहे.

“अचानक आक्रमक होईल अशी काही लक्षणं नव्हती”

या प्रकरणी पहिला एफ आय आर बोईसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यता आला आहे. मात्र वास्तविक ही घटना बदलापुरात घडली. आरोपीच्या पत्नीने बोईसर इथं दिलेल्या तक्रारीनुसार तिथं गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर हे प्रकरण ठाणे क्राईम ब्रांचकडे देण्यात आले होते. कोर्टाच्या परवानगीने याप्रकरणातील चौकशीसाठी आरोपीची पोलीस कस्टडी ठाणे क्राईम ब्रांचला दिली होती. त्यासाठीच त्याला नेलं जात होतं, त्यादरम्यान आरोपी शांत बसला होता. तो अचानक आक्रमक होईल अशी काही लक्षणं नव्हती, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली.

जवळ कोणतं रुग्णालय नव्हता का? 

यानतंर कोर्टाने वकिलांना घटनेच्या किती वेळानंतर रुग्णालयात पोहोचले, अशी विचारणा केली. त्यावर सरकारी वकिलांनी 25 मिनिटात पोहोचल्याचे सांगितले. त्यावर जवळ कुठला रुग्णालय नव्हता का? असा सवाल कोर्टाने केला. या घटनेनंतर आरोपीसह जखमी पोलीसांना तातडीनं रूग्णालयात नेलं. 23 सप्टेंबरच्या संध्याकाळी 7:52 वाजता डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केलं. 24 सप्टेंबरच्या 4:56 या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर 8 वाजता बॉडी जेजेत पोस्टमार्टमसाठी पाठवली. त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केलेलं आहे. जखमी पोलीसाच्या मांडीतून गोळी आरपार गेली आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.

यानंतर न्यायमूर्तींनी आरोपीने पिस्तूल की रिव्हॉल्वर कशामधून गोळी मारली? त्यावर सरकारी वकिलांनी पिस्तुल असे सांगितले. आरोपीने पिस्तुलचे लॉक उघडून ते लोड करून फायर केले का? असा सवाल कोर्टाने विचारला. त्यावर पिस्तुल कशी फायर केली याबाबत वकिलांकडून स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी हा बचाव नाकारला आहे. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाहीत, सर्वसाधारण व्यक्ती ही ट्रेनिंग घेतल्याशिवाय पिस्तुल फायर करू शकत नाही, असे न्यायालयाने यावेळी म्हटले.

काही गोष्टी न पटण्यासारख्या

सामान्य व्यक्तीला स्लायडर मागेही खेचता येणार नाही? तुम्ही कधी ते चालवलंय का?, न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वकिलांना सवाल विचारला. मी अंदाजे 500 राऊंड फायर केले आहेत. त्यामुळे काही गोष्टी न पटण्यासारख्या आहेत, असे हायकोर्टाने म्हटले.

आरोपीने अचानक अधिकाऱ्याच्या कमरेत खोचलेलं पिस्तुल खेचलं आणि तीन राऊंड फायर केले. सरकारी वकिलातर्फे कोर्टात याबद्दलचा दावा करण्यात आला. घटनेच्या वेळी त्या गाडीत चार पोलीस अधिकारी होते, जे पूर्णपणे प्रशिक्षित होते. त्यातला एक एन्काऊंटकर केलेला पारंगत अधिकारी होता. या सर्वांवर आरोपी वरचढ ठरून पिस्तुल कशी हिसकावू शकतो? हे समजणं थोडं कठीण वाटतंय, असे हायकोर्टाने म्हटले.

सध्या सीआयडी चौकशी सुरु

कोर्टाने विचारले की ज्या अधिकाऱ्याने एन्काऊंटर केला तो कोणत्या बॅचचा होता ? त्यावर सरकारी वकिलाने अनभिज्ञता दर्शविली. या प्रकरणात तपास कोण करत होतं? या प्रकरणी सध्या सीआयडी चौकशी सुरु आहे. ठाणे पोलीसकडून ही केस सीआयडीला ट्रान्सफर करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;