मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे ‘फक्त’ रात्रीस खेळ चाले…; अमित ठाकरेंचा निशाणा

मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे ‘फक्त’ रात्रीस खेळ चाले…; अमित ठाकरेंचा निशाणा

मुंबई विद्यापीठाची बहुचर्चित पदवीधर अधिसभा अर्थात सिनेट निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या या निवडणुकीसाठीचं मतदान होणार होतं पण त्याआधी निवडणुकीला दोन दिवस असताना ही निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मागच्या वर्षभरात दुसऱ्यांदा ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे ‘फक्त’ रात्रीस खेळ चाले, अशा शब्दात अमित ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर टीका केली आहे.

अमित ठाकरे यांची पोस्ट

मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे ‘फक्त’ रात्रीस खेळ चाले…

दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुका पार पडणार होत्या. मात्र, विद्यापीठाने पुन्हा एकदा मागील वेळेसारखंच रात्रीच्या वेळेस एक परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. ही काही पहिली वेळ नाही. मागील निवडणुका जाहीर झाल्यानंतरही रात्रीच्या वेळीच राजकीय दबावाला बळी पडून परिपत्रक काढले गेले होते. आता दुसऱ्यांदा अशाच प्रकारे सिनेट पदवीधर निवडणुकांसंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे, आणि प्रत्येक वेळी रात्रीच परिपत्रक निघते, त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा कारभार रात्रीस खेळ चाले या मालिकेसारखा चालू आहे की काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

मुळात कोणतीही निवडणूक, मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची असो, विधानसभेची असो, लोकसभेची असो, अथवा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका असो, या सहकारी व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीवर आणि परीश्रमांवर लढवल्या जातात. त्यासाठी राजकीय संघटनांचे, विद्यार्थी संघटनांचे अनेक सहकारी व पदाधिकारी दिवस-रात्र परिश्रम करत असतात. परंतु, मुंबई विद्यापीठाने जर सिनेट पदवीधर निवडणुका जाहीर करून रद्द करण्याचेच धोरण अवलंबले असेल, तर याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जाहीर निषेध करते. निवडून आलेले सिनेट सदस्य हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देतात. त्यामुळेच या निवडणुकांचे गांभीर्य विद्यापीठाला लवकरात लवकर समजले तर बरे होईल.

मागील वेळीसुद्धा जेव्हा विद्यापीठाने निवडणुका रद्द केल्या होत्या, तेव्हा मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या बाबतीत मुंबई विद्यापीठाच्या अनाकलनीय कारभाराचा जाहीर निषेध केला होता. मुंबई विद्यापीठ हे राजकीय दबावाला बळी पडत असून, एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे. म्हणूनच यावेळी जेव्हा मुंबई विद्यापीठाने पुन्हा निवडणुका जाहीर केल्या, त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या निवडणुकांचा सखोल अभ्यास केला आणि निवडणुका कायद्याला धरून नसल्याचे लक्षात आल्याने, त्या पुन्हा पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता आधीच व्यक्त केली.

माझे सहकारी निवडणूक लढवण्याच्या बाजूने होते. त्यांचा सन्मान राखत, त्यांना विद्यापीठाचा भविष्यातील भोंगळ कारभार समजावून सांगितला आणि त्यांनाही परिस्थितीची जाणीव झाली. त्यामुळेच माझ्या सहकारी आणि पदाधिकाऱ्यांचे परीश्रम वाया जाऊ नयेत, म्हणून आम्ही २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या सिनेट पदवीधर निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. काल मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत, हे पाहून आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. मुंबई विद्यापीठ प्रशासनाला लवकरच निवडणुकीचा चालवलेला हा खेळ बंद करण्याची सद्बुद्धी येवो, ही अपेक्षा व्यक्त करतो !!!

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;