गुजरात प्रेमापोटीच सुरत लुटीला…,जितेंद्र आव्हाड यांची फडणवीसांवर टीका, इतिहासाचे दिले दाखले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली. शिवप्रेमींनी या घटनेचा निषेध केला. महाविकास आघाडीने याबाबत तीव्र शब्दात निषेध नोंदवला. हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया या असा पायी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. इतिहासातील घटनांचे दाखले देत जितेंद्र आव्हाडांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असं आव्हाड म्हणालेत.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शंका का निर्माण करता? महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आता सुरत लुटीचा चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. ज्यांचे गुजरातप्रेम ओसंडून वहात आहे. ते सुरत लुटीला चुकीचे ठरवत आहेत, असं आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट
महाराजांबद्दल शंका का निर्माण करता? महाराष्ट्र माफ करणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी केली अन् सुरत लुटली, हे ऐतिहासिक सत्य आहे आणि ती ही दोन वेळा १६६४ आणि १६७० अनेक तत्कालीन बखरींमध्ये त्याची नोंद आहे. अनेक इतिहासकारांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या स्वारीचे मुख्य कारण हे जंजि-याच्या सिद्धीशी लढाई हेच होते. महाराज सिद्धीशी लढत असताना त्याला प्रचंड शस्त्रसाठा आणि बोटी सुरतेहून पुरविल्या गेल्या होत्या. त्याचा राजकीय राग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात होता आणि सुरत लुटीमागे हे एक प्रमुख कारण होते. तसेच, स्वराज्याची धनसंपदा वाढविणे, हेही मुख्य कारण सुरत लुटीमागे होते. देशातील प्रमुख व्यापारी केद्रांपैकी सुरत हे एक व्यापारी केंद्र होते.
या स्वारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना एम्ब्राॅज् नावाच्या एका ख्रिश्चन पाद्रीचे घर दाखवण्यात आले होते. पण, पाद्रीच्या दयाळू वृत्तीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे घर लुटण्यास नकार दिला. तेथेच एक पारेख नावाचे गृहस्थ रहात होते. प्रचंड श्रीमंत असलेल्या पारेख यांची दयाळू, दानशूर अशी ख्याती होती. महाराजांच्या आगमनापूर्वीच पारेख यांचे निधन झाले होते. गरीबांना मदत करणाऱ्या पारेख यांच्या घरालाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पर्श केला नाही. सुरत लुटीचा इतिहास तपासताना हे बघणे अत्यंत महत्वाचे आहे की, या स्वारीत कुठेही रक्तपात, अत्याचार झाला नाही की स्त्रियांशी कोणीही बेअदबी केली नाही. महाराजांनी दोनवेळा सुरत लुटली. पण, दोन्हीवेळा रक्तपात, अत्याचार झाला नाही की स्त्रियांशी कोणीही बेअदबी केली नाही.
आता सुरत लुटीचा चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. ज्यांचे गुजरातप्रेम ओसंडून वहात आहे ते सुरत लुटीला चुकीचे ठरवत आहेत. पण, सुरत लूट ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची निशाणी आहे. या स्वारीत महाराजांनी कोणालाही त्रास दिला नाही. म्हणूनच तर व्यापाऱ्यांनी समझौता करून आपली संपत्ती महाराजांच्या स्वाधीन केली त्यांना महाराजांनी मोठ्या मनाने माफ केले पण जे मग्रुरीने वागले त्यांना धडा शिकवला. त्यामुळे सुरतेवरील स्वारी ही महाराजांच्या शौर्याची आणि शत्रूला क्षमा न करण्याची वृत्ती दाखवून देते. सिद्धीला सुरतने मदत केली म्हणून सुरतला धडा शिकवण्यासाठी महाराजांनी हा हल्ला केला होता. जगातल्या सर्वच इतिहासकारांनी याची नोंद घेतली आहे. अगदी लंडन गॅझेटीएरमध्येही याची नोंद करण्यात आली आहे. ज्येष्ठ इतिहासतज्ञ बर्नियर यांनीही आपल्या पुस्तकात याची नोंद केलेली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहासकार यांच्या लेखणात ही नोंद आहे
अचानक सुरत लुटली नसल्याचा व केवळ छावणी लुटल्याचा इतिहास मा. देवेंद्र फडणवीस साहेबांना कुठून मिळाला, हेच समजत नाही. एकीकडे पुतळा पडल्याने महाराष्ट्रातील वातावरण खराब झालेले असतानाच महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असलेल्या शिवरायांच्या बहादुरी आणि शौर्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे का व कशासाठी?
महाराजांनी इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज, डच, ह्यांच्या वखारी ही लूटल्या मग एकच छावणी लुटली असे कसे म्हणता येईल. सुरत हल्ल्याला चुकीचे ठरविणे हा तद्दन मुर्खपणा आणि महाराजांचा अवमान आहे. त्यांच्या शोर्यावर व युद्ध चातुर्य ह्या वर शंका घेण्या सारखे आहे. जेम्स लेन ह्याने चुकीच्या माहीती च्या आधारा वर माँ साहेबांची बदनामी केली महाराजांच्या पितृत्वा वर शंका निर्माण केली. आज सूरत लुटी बद्दल चुकीचा इतिहास सांगून त्यांच्या शौर्य आणि कर्तृत्वा बद्दल शंका निर्माण केली. कुठल्या मनुवाद्याने हे खुळ फडणवीस साहेब तुमच्या डोक्यात टाकले. काळानी अनेक वेळा सिद्ध केले की इतिहासाचे विकृतीकरण झिडकारले जाते.
महाराजां बद्दल शंका का निर्माण करता
एवढा राग का व कश्या साठी
महाराष्ट्र माफ करणार नाहीछत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी केली अन् सुरत लुटली, हे ऐतिहासिक सत्य आहे आणि ती ही दोन वेळा १६६४ आणि १६७० मध्ये अनेक तत्कालीन बखरींमध्ये त्याची नोंद आहे. अनेक इतिहासकारांनीही…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 2, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List