Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या दुर्घटनेवरुन ब्लेमगेम सुरु? पाहा व्हिडीओ
शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर आता जबाबदाऱ्यांवरुन ब्लेमगेम सुरु झालाय. एक विभाग स्वतःचे हात झटकतोय., दुसरा विभाग नौदलानं पुतळा बांधल्याचं सांगतोय. नौदल यावर स्वतःची बाजू मांडण्याची शक्यता कमीच आहे. ज्या शिल्पकाराकडे या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. तो जयदिप आपटे फरार झालाय. पण तो फरार झाला की करण्यात आला, अशी शंका विरोधक वर्तवतायत.
पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार आपटे माध्यमांना फोनवर प्रतिक्रिया देत दुर्घटनास्थळी जात असल्याचं सांगत होता. मात्र प्रत्यक्षात त्याचवेळी तो फरार झाला. त्याच्या कल्याणच्या घरालाही कुलूप लागलंय. पोलीस तो सध्या घरी परतेल या आशेनं त्याच्या घराबाहेर पहारा देतायत.आता मालवणातल्या शिवरायांच्या पुतळा प्रकरणात किती गुंतागूंत आहे. शिल्पकार आपटेच्या एका मुलाखतीनंच त्याला कसं अडचणीत आणलं. ते समजून घेण्याआधी पुतळा उभारताना कोणत्या विभागाकडे काय काम येतं., ही पार्श्वभूमी समजून घेऊयात.
महापुरुषाचा पुतळा उभारायचा असेल तर भूमी अभिलेख , एमएसईबी, पीडब्लूडी, नगररचना विभाग, कला संचलनालय, सामान्य प्रशासन, गरज असल्यास दूरसंचार, पोलीस विभाग, महामार्ग प्राधिकरण विभाग याहून अधिकच्या विभागांकडून एनओसी म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र लागतं. इतर कागदपत्रांत पुतळा उभारणाऱ्या संस्थेचा ठराव, संस्थेची कागदपत्रं, मोजणीचा नकाशा, मालमत्ता पत्रकाचा पाठपुरावा करावा लागतो.
आता मालवण प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार पुतळा उभा राहतो कसा., त्याची प्रोसिजर काय ते समजून घ्या. पुतळा उभारण्याचं ठरवलं नौदलानं त्याला परवानगी दिली राज्य सरकारनं शिल्पकार म्हणून आपटेला निवडलं गेलं. उंच पुतळा साकारण्याआधी त्याचं एक क्ले मॉडेल अर्थात लहान प्रारुप बनवलं जातं. त्या प्रारुपाला महाराष्ट्र सरकारच्या कला संचालनालय मंजुरी देतं. मंजुरी देणाऱ्या कमिटीत शिल्पतज्ज्ञ-इतिहासकार असतात. म्हणजे याच पद्धतीनं लहान प्रारुपाचा मोठा पुतळा तयार होईल, असं गृहीत धरलं जातं पुतळ्यासाठी जो चबुतरा उभा राहतो, त्याला मान्यता पीडब्लूडी देतं.
पाहा व्हिडीओ:-
आता या प्रकरणात शिवरायांच्या पुतळ्याच्या प्रारुपला मान्यता दिली राज्य सरकारच्या कला संचालनालय विभागानं. चबुतरा उभारला पीडब्लूडीनं…पुतळा साकारण्याचं काम झालं नौदलाच्या वतीनं. पुतळ्याभोवतीचं सुशोभीकरण केलं पीडब्लूडीनं. मात्र पुतळा कोसळल्यानंतर कला संचालनालयानं आपल्याला फक्त ६ फुटांचा पुतळ्याची परवानगी मागितली गेल्याच सांगत या कामालाच बेकायदेशीर ठरवलंय पीडब्लूडी विभागाच्या समोर आलेल्या पत्रातून त्यांनी नौदलाला दुरुस्तीबद्दल पत्र लिहिलंय. नटबोल्ट का गंजले, लोखंड कोणतं वापरलं., या प्रश्नांची उत्तर देणारा शिल्पकार आपटे फरार आहे. नौदलानं अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
दुसरीकडे दुर्घटनेआधी दैनिक सतानत प्रभातला दिलेल्या मुलाखतीत शिल्पकार आपटे स्वतःचं कौतुक म्हणून अनेक धक्कादायक दावे करतोय. इतका उंच पुतळा उभारायला ३ वर्ष लागतात, पण आपण ते काम फक्त ६ महिन्यात केलं सुचनांनुसार शिल्प न निवडता अचानक बनवलेलं शिल्प पुतळ्यासाठी निवडलं गेलं. पुतळ्याचं मिळालेलं काम ही संधी मोठी होती, पण चूक झाल्यावर सगळं संपेल असंही वाटत होतं पण नंतर ठरवलं की काय व्हायचं ते होऊ दे, ही संधी सोडायची नाह. पुतळ्यासाठी 3 पैकी जे अचानकपणे मॉडेल तयार झालं., तेच पुतळ्यासाठी निवडलं गेलं एका रात्रीत 18 थ्री डी प्रिंटर उभे करुन काम सुरु झालं.
त्यामुळे सरकारच्या विविध खात्यांच्या भूमिकांवरच विरोधक प्रश्न उभे करतायत. त्यात पीडब्लूडीनं नंतर हे काम स्थानिक संस्थांकडे न सोपवल्यामुळे पुतळा परिसरातील वीजही कापण्यात आली होती, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी केलाय. त्यात सरकारनं या कामासाठी केलेल्या खर्चावरूनही विरोधकांनी घोटाळ्याचे आरोप केलेत. विरोधकांच्या आरोपांनुसार मोदींसाठी तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या हेलिपॅड्ससाठी 2 कोटी 3 लाख खर्च झाले आणि पुतळ्यावर २ कोटी 40 लाखांचा खर्च केला गेला सुशोभीकरणावर वेगळा खर्च झाला. पण तरीही काम निकृष्ट कसं झालं., यावरुन सवाल केले जातायत.
शिवरायांचा पुतळा नेमका कुठे होता., ते सुद्दा गुगल अर्थच्या मदतीनं पाहूयात. हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. बाजूला हा समुद्र. हा सिंधुदुर्गातील मालवण तालुका…समुद्रात दिसणारा हा सिंधुदुर्गचा किल्ला आणि त्याच्यासमोर असलेला हा राजकोट किल्ला. शिवाजी महाराजांनी याचठिकाणी स्वराज्याचं आरमार उभारलं होतं. याठिकाणी शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला., पुतळ्याचा चेहरा समुद्राच्या या बाजूनं होता.
दरम्यान, पीडब्लूडी मंत्री रविंद्र चव्हाणांच्या मते पुतळा खाऱ्या वाऱ्यांमुळे गंज लागून पडला असावा. मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की पुतळा ताशी ४५ किमी वाऱ्यानं वाहिल्यामुळे पडला असावा. शिक्षणमंत्री केसरकरांच्या मते भव्य पुतळा उभा राहावा ही शिवरायांचीच इच्छा असावी., म्हणून आत्ताचा पुतळा पडला असावा. मात्र दुसरीकडे विद्यमान सरकारनंच निकृष्ट काम म्हणून शिल्पकारासह एकावर गुन्हा दाखल केलाय
सरकार वाऱ्याच्या वेगाचा जो दावा करतंय. त्यावर स्थानिकांना काय वाटतं. नेमकं त्यादिवशी काय घडलं., ते ऐकूयात. सरकार म्हणतंय की विरोधक पुतळ्यावरुन राजकारण करतायत. दुसरीकडे सत्तेत सामील राहून अजित पवार गटाचेच कार्यकर्त्यांनी यावर निषेध नोंदवलाय. भाजपच्या आशिष शेलार आणि अजित पवारांनी घडलेल्या दुर्घटनेबद्दल माफी मागितलीय. फडणवीसांच्या मते पुतळा नौदलानं उभारला असून चौकशीअंती दोषींवर कारवाई होणाराय.
तूर्तास सारे सरकारी विभाग दुर्घटनेवर स्पष्टीकरण देताना गोंधळात असल्याचं दिसतंय. स्वतः आपटेनंच ६ महिन्यांपूर्वीच्या मुलाखतीत अप्रत्यक्षपणे काम किती घाईनं आणि बेजबाबदारपणे झालं., हे स्वतःच सांगून टाकलंय. आम्ही 6 फुटांचीच मंजुरी दिली होती, हे दुर्घटनेनंतर कला संचालनालय सांगतंय. नटबोल्ट्सना गंज लागतोय, हे आधीच कळाल्यानंतरही पीडब्लूडीनं नौदलाला फक्त पत्र लिहिण्यापलीकडे स्वतः काहीही हातपाय हलवले नाहीत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List