मिंधे सरकारचं करायचं काय?… उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनाभवनासमोर शिवसैनिकांचा संताप; भरपावसात आंदोलन
बदलापूरला दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. घटनेच्या निषेधार्थ आज महाविकासाआघाडीकडून मूक आंदोलन करण्यात येत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधत निषेध आंदोलन केले जात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनाजवळ निषेध आंदोलन केले.
बदलापूर घटनेच्या निषेध नोंदवण्यासाठी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक आंदोलन केलं जात आहे. मुंबईच्या शिवसेना भवन परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे हातात काळा झेंडा हातात घेऊन शिवसेना भवन परिसरात आंदोलन करताना दिसत आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी तोंडावर काळा मास्क लावला आहे. तर त्यांच्या दंडावर काळी रिबीनही बांधल्याचे दिसत आहे.
सध्या मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भर पावसातही ठाकरे गटाचे हे निषेध आंदोलन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या या निषेध आंदोलनात स्वत: उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे असे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले आहे. त्यासोबतच संजय राऊत, अनिल देसाई यांच्यासह हजारो शिवसैनिक निषेध आंदोलनात सहभागी झाले आहेत. सध्या शिवसेना भवन परिसरात असंख्य शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसत आहेत.
या आंदोलनावेळी शिवसैनिकांकडून राज्य सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. मिंधे सरकारचं करायचं काय?, आम्हाला नको लाडकी बहीण, आम्हाला हवी सुरक्षित बहीण, शिंदे सरकार हाय हाय अशा घोषणा करण्यात आल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List