लाडक्या लेकींचा उद्रेक, गृहखात्याची लक्तरे!; बदलापूर अत्याचार प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

लाडक्या लेकींचा उद्रेक, गृहखात्याची लक्तरे!; बदलापूर अत्याचार प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

बदलापूर शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. राज्यभरातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. काल बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरत चिमुकल्यांना न्याय देण्याची मागणी केली. यावेळी हजारो लोकांनी रस्त्यावर आणि रेल्वे ट्रॅकवर उतरत आंदोलन केलं. या घटनेवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही या घटनेवर भाष्य करण्यात आलं आहे. ‘लाडक्या लेकींचा उद्रेक!, गृहखात्याची लक्तरे’ या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. या अग्रलेखातून संजय राऊतांनी राज्य सरकार आणि गृहखात्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा

गुन्हा कुठलाही असो, आधी पीडितांवर दबाव आणायचा, गुन्हा दाखल करायला विलंब करायचा, मधल्या काळात शक्य तेवढय़ा ‘साफसफाई’ चा प्रयत्न करायचा आणि जनतेच्या संतापाचा लाव्हा उसळलाच तर ‘ऍक्शनमोड’ वगैरेवर यायचे हेच राज्याच्या गृहखात्याचे सध्या ‘ मोड ऑफ ऍक्शन ‘ बनले आहे . बदलापुरातील चिमुरडय़ांवरील अत्याचार प्रकरणातही तेच कायम राहिले हे महाराष्ट्राचे दुर्दैव . नवी मुंबई , रायगड आणि आता बदलापूर – पुणे … स्त्री अत्याचाराच्या किंकाळय़ा थांबायला तयार नाहीत . या घटना राज्याच्या गृहखात्याची लक्तरेच आहेत . मिंधे – फडणवीसांच्या राज्यात ‘ लाडक्या बहिणीं ‘ च्या ‘ लाडक्या लेकी ‘ देखील सुरक्षित नाहीत . बदलापुरात उफाळून आलेला लाव्हा याच लाडक्या लेकींचा उद्रेक आहे!

बदलापूरमध्ये दोन चिमुरडय़ांवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याने वातावरण पेटले आहे. संतप्त पालक आणि जनता रस्त्यावर उतरली. संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटत आहेत. प्रश्न संतप्त जनतेचा नाही, तर लोक रस्त्यावर उतरल्यानंतर ‘ऍक्शन मोड’मध्ये येणाऱ्या राज्यकर्त्यांचा आहे. या घटनेने मानवी विकृती आणि अमानुषतेचा क्रूर चेहरा तर समोर आलाच, परंतु त्याचबरोबर राज्यकर्त्यांचा स्त्रीदाक्षिण्याचा मुखवटाही टराटरा फाडला.

‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय ही मंडळी उठताबसता घेत आहे. हे सरकार भगिनींना पैसे तर देत आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेचे काय? ती कधी देणार? तुमच्या राज्यातील तीन-चार वर्षांच्या चिमुरडय़ाही सुरक्षित नसतील, नराधमांच्या विकृतीच्या बळी ठरत असतील तर ‘भावा’च्या नात्याचे ढोल पिटण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हे ढोल नसून ढोंग आहे. बदलापूरच्या संतापजनक घटनेने आणि पोलिसी निक्रियतेने हे ढोल फोडले आहेत. ना तुम्ही बहिणींचे रक्षण करू शकत आहात ना सत्तेचा, कायद्याचा वचक राज्यात राहिला आहे. बदलापूर प्रकरणातही ते दिसलेच.

स्त्री अत्याचारांसारख्या संवेदनशील प्रश्नातही घाणेरडा भेदभाव तुम्हीच करीत आहात. कोलकात्यात बलात्काऱ्याविरोधात भाजपवाले रस्त्यावर उतरतात, मात्र तिकडे वाराणसीमधील बलात्काराचा आरोप असलेल्या सक्षम पटेल याच्याकडून त्यांच्याच पक्षाचे पंतप्रधान हार-तुरे स्वीकारतात. स्त्री अत्याचारासारख्या नाजूक विषयाला राजकारणाच्या आणि राजकीय फायद्या-तोटय़ाच्या तागडीत टाकणारा भाजपच आहे. तेव्हा बदलापूरसारख्या दुर्दैवी घटनांचे विरोधकांनी राजकारण करू नये, हे फडणवीस कुठल्या तोंडाने सांगत आहेत? विरोधकांवर आगपाखड करण्यापेक्षा आपले सरकार गुन्हे आणि अत्याचारांबाबत कुंभकर्णी ‘मोड’वर का गेले आहे? जनता आणि विरोधकांनी आंदोलनाचे ढोल, नगारे बडविल्याशिवाय त्याला जाग का येत नाही याचे आत्मचिंतन फडणवीसांनी करावे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;