स्वप्नील कुसाळेला फोन का केला नाही? उद्धव ठाकरे यांच्याकडून मनाची घालमेल व्यक्त
परिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे या तरुणाचा सत्काराचा कार्यक्रम आज मुंबईत पार पडला. महाराष्ट्र रायफल असोसिएशनकडून स्वप्नीलचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचीदेखील उपस्थिती होती. उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाषण करताना आपण स्वप्नाल कुसाळे याला अभिनंदन करण्यासाठी का फोन केला नाही? यामागील कारण सांगितलं. आपण स्वप्नील याच्या मामांना फोन करुन अभिनंदन केल्याचं आणि विचारपूस केल्याचंदेखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणं ही काही सोपी गोष्ट नाही. सर्वच पदकचं महत्त्व असतं. पण ऑलिम्पिकच्या पदकाला वेगळा सन्मान असतो. आम्ही तर टीव्हीवर पाहत असतो की, कसे आपले खेळाडू खेळत असतात. या पदकाचं महत्त्व पाहिलं, ऑलिम्पिक जिंकल्यानंतर जगभरातील दिग्गज खेळाडूंच्या भावना वेगळ्या होत्या. मी एकदा विचार केला की, समजा आपण ऑलिम्पिकला गेलो आहे, आणि बंदूक माझ्या हातात आहे, तिथलं सगळं वातावरण, दबाव असताना, अचूक पदक जिंकणं हे खूप महत्त्वाचं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘उद्या पेपरला बातमी यायची, उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि नेम चुकला’
“स्वप्नील आम्हाला सर्वांना तुझा अभिमान वाटतो. स्वप्नीलने जो पराक्रम गाजवला, मी अशोकजींना फोन केला की, स्वप्नीलचा नंबर मिळेल का? नंबर लगेच मिळाला. फोन फिरवला तेवढ्यात लगेच विचार आला, नको, उद्या पेपरला बातमी यायची, निशाणा धरला, उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि नेम चुकला. त्यामुळे मी तुला फोन केला नाही. मी तुझ्या मामाला फोन केला. मामा अतिशय भारावून बोलत होता. स्वप्नील जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी घरी फोन करुन चौकशी करतो. कितीही मोठं झालं तरी जो आपल्या आई-वडिलांना विसरत नाही तोच कीर्तीची सर्व शिखरं पार करतो”, असं उद्धव ठाकरे स्वप्नीलला उद्देशून म्हणाले.
“मला असं वाटतं की, तू (स्वप्नील) आता सुरुवात केली आहे. मला अशोकजींनी बंदूक हातात घेणं शिकवलं आहे. त्यामुळे नेम चांगला-वाईट काय असेल, त्याला जबाबदार हेच आहेत. मी तेव्हा बघितलं की, सर्व मुलं स्वत: विक्रमवीर झालेच, पण आपल्यासारखे विक्रमवीर तयार करायला लागले. तुमचा सुद्धा मला अभिमान आहे. तुम्ही खरंच खूप मोठं काम करत आहात”, असं उद्धव ठाकरे महाराष्ट्र रायफल असोसिएशनला उद्देशून म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List