‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत गुवाहाटीला गेलो’, एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीबाबत नवा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत आपण गुवाहाटीला गेलो होतो, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी सविस्तर भूमिका मांडली. “आम्ही गुवाहाटीला जाणं ही आमची रणनीती होती. मी लपूनछपून गेलो नाही. मी खुलेआमपणे गुवाहाटीला गेलो. मी बात करत-करत गेलो. उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला. मी रस्त्यात होतो. मी त्यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत गेलो”, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला.
“उद्धव ठाकरेंनी मला खूप आव्हान दिलं की, परत येऊन दाखव. वरळीहून येणार, लाखो लोकं येणार, रस्ता जाम करणार, आमदारांना विधान भवनात जाऊ दिलं जाणार नाही, अशा धमक्या दिल्या गेल्या. मी सांगितलं, मी सुद्धा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे. तुम्ही कुणाला घाबरवत आहात? ज्याने पक्षासाठी दिवसरात्र काम केलं, मी घाबरणाऱ्यांमधील नाही”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“मी लहानपणापासून पक्षासाठी काम करत आहे. त्यामुळे मला हे सर्व नको होतं. पण कुणाला हवं असेल तर ती माझी जबाबदारी नव्हती. मी तिथून आलो. हेलिकॉप्टर तिथे बाजूला होतं. मला हेलिकॉप्टरमध्ये बसायला सांगितलं. मी हेलिकॉप्टरमध्ये बसलो नाही. मी रस्ते मार्गाने आलो आणि जिथे पोहचायचं आहे तिथे पोहोचलं. कुणाला घाबरवत आहात? ज्याने पक्षासाठी दिवस-रात्र काम केलं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे. मला सर्व माहिती आहे. मी काम करणारा आहे. जेव्हा कोरोना संकट होतं तेव्हा आम्ही काम करायचो. रुग्णालयात पीपीई किट घालून जायचो. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षाच्या कार्यकाळाची माहिती घ्या. घरात बसून सरकार चालवता येत नाही. फेसबुक लाईव्हने सरकार चालत नाही”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
“लोकांना भेटावं लागतं. त्यांची भेट घेऊन समोरासमोर चर्चा करावी लागते. लोकांमध्ये जावं लागतं. दुर्घटना झाली तर तिथे पोहोचणं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर शेताच्या बांधावर जावं लागतं आणि मदत करावी लागते. मी माझ्या कामावर फोकस करतो. पण उद्धव ठाकरे आमच्या सरकारबाबत वेगवेगळे दावे करत आहेत. सरकार आज पडणार, उद्या पडणार, दोन महिन्यांनी पडणार, अशी वक्तव्ये करत आहेत. त्यांनी विकासाचे अनेक प्रकल्प रोखून ठेवले होते. अनेक कामं बंद केली होती ती कामे आम्ही सुरु केले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List