‘महाराष्ट्र, मुंबई द्वेष्ट्यांच्या बुडाला मशालीची धग लावायची की नाही?’; उद्धव ठाकरे बरसले
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मार्मिकचा आज 64 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच त्यांनी मार्मिकच्या आतापर्यंतच्या प्रवासावर भाष्य केलं. “मार्मिकचं वय सांगताना माझं वय सांगण्याची गरज नव्हती. मार्मिक तरुण आहे. मी बाळासाहेबांचा पुत्र आहे. मार्मिक हा चमत्कार आहे. सामना चमत्कार आहे. एका व्यंगचित्रकाराने एका कुंचल्याच्या आधारावर हे उभं केलं आहे. प्रत्येकाने हा किल्ला समर्थपणे लढवला. तो काळ भारावलेला होता. व्यंगचित्र बघता बघता मी लहानाचा मोठा झालो. मार्मिक आणि माझा जन्म एकाच वर्षातला. १९६०चा. आज मी मार्मिकचा संपादक आहे. शिवसेनेची स्थापना माझ्यासमोर झाली. माझ्यासमोर नारळ फोडला. त्याच्या शिंतोड्याने मी भिजून गेलो. हा वारसा आपण घेऊन जात आहे. तुम्ही संकटातही साथ देत आहात. त्यामुळे मी शत्रूची का पर्वा करू. मार्मिकची सुरुवात अशी झाली”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“महाराष्ट्रात मुंबई मिळवली. पण मुंबईत मराठी माणसाचं स्थान काय? मराठी माणूस नोकरी सोडून जात होता. नोकरी मिळत नव्हती. कोणी दारात उभं करत नव्हतं. ज्या विभागात मराठी माणसाला एन्ट्री नव्हती तिथे स्थानिय लोकाधिकार समिती आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला
“भास्कर जाधव तुम्ही म्हणाला जास्तीत जास्त वर्गणी काढा. पण आजचा जमाना असा आहे की वर्गणीदार जास्त म्हणजे मार्मिक माझा असं म्हणतील. डेस्टिनेशन रिलेशनशीप सुरू आहे. म्हणजे हॉटेल सर्व बुक करतात. १०० एक लोक जमतात. सर्व रुम बुक करतात आणि म्हणतात आजपासून हॉटेल माझी”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
ठाकरेंचा भाजप नेत्यांवर घणाघात
“तेव्हा जशी कुंचल्याचा पलिता झाला होता. तशीच आज कुंचल्याची मशाल झाली आहे. तेव्हा कुंचल्याची मशाल शिवसेनाप्रमुखांनी तेव्हा केली तर आज का होऊ द्यायची नाही? आज मुंबई आपल्यासाठी उपरी होत असेल तर आपण उठलं पाहिजे. दोन लोक दिल्लीत बसले आहेत. त्यांच्या बुडाला मशालीची धग लावायची की नाही? मुंबईचे द्वेष्टे आपल्या खांद्यावर बसून दिल्लीत बसले. आज आपल्याला फेकायची भाषा करत असतील तर त्यांचे तंगडे उचलून फेकायची की नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List