Sanjay Raut : राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकल्या तेव्हा आम्ही… संजय राऊत ‘त्या’ घटनेवर नेमकं काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी नुकतीच भूमिका जाहीर केली. त्यावरुन वाद उफाळला. मराठा संघटना आक्रमक झाल्या. त्यातच बीड जिल्ह्यातून त्यांचा ताफा जात असताना शुक्रवारी, 9 ऑगस्ट रोजी त्यांच्या ताफ्यावर काही लोकांनी सुपारी फेकली. सुरुवातीला हे आंदोलक मराठा असल्याचे सांगण्यात येत होते. पण त्यानंतर हे ठाकरे गटाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली. आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.
ते पदाधिकारी असतील पण पक्षाशी त्यांचा संबंध नाही
राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपार्या फेकल्या ते शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात पण त्या आंदोलनाचा पक्ष म्हणून काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं, आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात विशेषता मराठवाडा आणि बीडमध्ये हे आंदोलन सुरू आहे त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं त्या विरोधात सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला, असे ते म्हणाले.
आमची ताकद जास्त म्हणून..
बीडमध्ये शिवसेनेची ताकद जास्त असेल त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील. त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही हे स्पष्ट करतो. मी असं म्हणत नाही ते आमचे कार्यकर्ते नसावेत ते 100% असतील, पण ते आंदोलन पक्षाचे नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे गट-मनसेत वाद पेटणार
मनसेने विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचे जाहीर केले आहे. त्यातच बीडमध्ये सुपारी आंदोलन झाले. राज ठाकरे हे बीड शहरात आल्यानंतर हा प्रकार घडला. सुरुवातीला मराठा आंदोलकांनी हा प्रकार केल्याचे समोर येत होते. पण त्यामागे उद्धव ठाकरे गटाचे आंदोलक असल्याचे स्पष्ट झाले. घटनेवेळी मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला. राजकीय विरोधातून हा प्रकार करण्यात आला. मराठा आरक्षणाचा त्याच्याशी काहीच संबंध नसल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी दावा केला.
या घटनेनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुरुवात उद्धव ठाकरे गटाने केली, आता शेवट आम्ही करू असा इशारा दिला होता. त्यावर शिवसेनेचे बीड जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांनी बीडमधून सुरुवात केली, शेवट मुंबईत करु असा पलटवार केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List