“…तर मुंबईकरांना खोटी आश्वासने का दिली?” संजय राऊतांचा सवाल

“…तर मुंबईकरांना खोटी आश्वासने का दिली?” संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut on Mumbai Rain Waterlogging : रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दाणादाण उडवून दिली. पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल कोलमडली. तर सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचेही तीन तेरा वाजले. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी राज्य सरकारची चांगलीच कानउघडणी केली आहे. ‘मुंबई तुंबणार नाही, मुंबई थांबणार नाही,’ अशा गर्जना तुम्ही का केल्या? मुंबईकरांना खोटी आश्वासने का दिली? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारच्या गैरव्यवस्थेची अब्रू वेशीवर टांगली

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून सरकारवर टीका केली आहे. पावसाळय़ात मुंबईत पाणी तुंबणार नाही, मुंबई थांबणार नाही, अशी गर्जना राणा भीमदेवी थाटात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. यंदाच्या पावसाळय़ात मुंबईकरांना अजिबात त्रास होणार नाही, असा दावाही केला होता. मात्र सोमवारच्या पहिल्याच पावसाने मुख्यमंत्र्यांच्या गर्जना तुंबलेल्या पाण्यात बुडविल्या. रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांसह, ठाणे, पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसाने राज्य सरकारच्या गैरव्यवस्थेची अब्रू वेशीवर टांगली, असे संजय राऊत म्हणाले.

कमी वेळात झालेला प्रचंड पाऊस आणि त्याच वेळी आलेली भरती यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी नेहमीच्या सखल भागात पाणी साचले, अशी नेहमीची मखलाशी सरकारतर्फे केली गेली. तुम्हाला हेच तुणतुणे वाजवायचे होते तर मग ‘मुंबई तुंबणार नाही, मुंबई थांबणार नाही,’ अशा गर्जना तुम्ही का केल्या? मुंबईकरांना खोटी आश्वासने का दिली? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

पहिल्याच पावसाने तुमचा गैरकारभार उघडय़ावर पाडला

“सोमवारचा दिवस उजाडण्यापूर्वीच मुंबईसारख्या महानगराचे संपूर्ण दळणवळणच केवळ चार-पाच तासांच्या पावसाने कोलमडून पडले. हा तुमच्या पावसाळापूर्व कामांचा दर्जा. पहिल्याच पावसाने तुमचा गैरकारभार उघडय़ावर पाडला. लाखो सामान्य मुंबईकरांचे, चाकरमान्यांचे हाल झाले. अर्थात, तुम्हाला त्याच्याशी कुठे देणेघेणे आहे? आता म्हणे, सोमवारी ज्या भागात पाणी साचले, त्या ठिकाणांचा पालिका अभ्यास करेल आणि तेथे पुन्हा पाणी साचणार नाही याची काळजी घेईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले. हे ‘वरातीमागचे घोडे’ आता दामटून काय फायदा?” असा रोखठोक सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.

मुंबई तुंबली की जाग आल्याचे नाटक करायचे

“पावसाळय़ापूर्वी झोपा काढायच्या आणि मुंबई तुंबली की जाग आल्याचे नाटक करायचे. नालेसफाई आणि मान्सूनपूर्व कामांचे दावे तर तुम्ही भरपूर केले होते. नालेसफाई 100 नव्हे तर 110 टक्के पूर्ण झाली असा भन्नाट दावा तुम्ही केला होता. गटारांची साफसफाई आणि मेनहोलची व्यवस्था यंदा खूप सुधारण्यात आली आहे, असेही तुम्ही म्हणाला होता. मुंबईत पावसाने जेथे पाणी जमा होते अशा ठिकाणी तब्बल 481 पंप बसविण्यात आले आहेत, अशा गमजा तुम्ही केल्या होत्या. पण तुमचे हे सगळे दावे सोमवारच्या पावसाने तुमच्याच घशात कोंबले”, असेही संजय राऊत म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;