पोलीस भरतीत उमेदवार मैदानात कोसळला तो उठलाच नाही, काय घडलं नेमकं
राज्यात सुमारे 17 हजार पदांसाठी पोलिस भरती सुरु आहे. या पोलिस भरतीची तयारी उमेदवारांनी अनेक महिन्यांपासून सुरु केली होती. 19 जून पासून पोलिस भरतीच्या मैदानी चाचण्या सुरु झाल्या आहेत. या पोलिस भरती दरम्यान अनेक मैदानी चाचणी उमेदवारांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागत असते. असाच काहीसा प्रकार नवीमुंबईतील पोलिस भरती प्रक्रियेमध्ये घडला आहे. धावण्याची चाचणी पूर्ण करीत असताना एक तरुण अचानक खाली कोसळल्याने त्याला तातडीने उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतू डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले आहे.
नवीमुंबईतील पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झालेला अक्षय बिऱ्हाडे याची बाळेगाव कॅम्प, एसआरपी भरती ग्रुप क्रमांक 11 येथे धावण्याची चाचणी सुरु असताना अचानक धावताना मैदानात कोसळला. यावेळी 500 मीटर अंतराची धावण्याची चाचणी होती. त्यावेळी अक्षय कोसळल्याने त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात राज्य राखीव दल आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
अमळनेरचा रहीवासी
अक्षय हा 23 वर्षांचा असून जळगावातील अमळनेरचा राहणारा आहे. नवी मुंबईतील बाळेगाव कॅम्प येथे सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत तो सहभागी झाला होता. 500 मीटर धावण्याची शर्यत पूर्ण होण्याआधीच तो मैदानात कोसळल्याने तत्काळ त्याला कळवातील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून अक्षयचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता की आणखी काही कारण आहे याचा तपास रुग्णालयाकडून करण्यात येणार आहे.
काळजी घेण्याचे आवाहन
राज्यात मोठी पोलिस भरती सुरु आहे. 19 जूनला ही पोलीस भरती सुरु झाली आहे. राज्यातील पोलिस भरती सुरु असताना कुठे पाऊस पडत होता. तर कुठे उन्हाचा तडाखा कायम होता. त्यामुळे यंदाच्या पोलिस भरतीत तरुणांची काळजी घ्यावी आणि एखादा दिवस पावसामुळे जर मैदानी चाचणी झाली नाही. तर तरुणांना अतिरिक्त दिवस द्यावा अशी देखील मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती. या संदर्भात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट टाकून सरकारला काळजी घेण्याचे आवाहन केले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List