Sharad Pawar : खरी राष्ट्रवादी कुणाची? 8 विरूध्द 1, मोठ्या पवारांनी दिले असे खणखणीत उत्तर

Sharad Pawar : खरी राष्ट्रवादी कुणाची? 8 विरूध्द 1, मोठ्या पवारांनी दिले असे खणखणीत उत्तर

गेल्या तीन वर्षांत राज्यातील सत्ता समीकरण अत्यंत वळणदार रस्त्यावर येऊन ठेपले आहे. दोन मोठ्या पक्षाला फुटीच्या राजकारणाने पोखरलं. या वळणदार राजकारणाची सवय नसलेल्या जनतेला लोकसभेच्या मतदानातून प्रतिक्रिया दिली. ती कुणासाठी अपेक्षित तर कुणासाठी अनपेक्षित होती. पण पारडे कुणाचे जड याचा फैसला जनतेने दिला. ‘कट्टप्पाने बाहुबली को क्यों मारा’ या प्रश्नागत खरी शिवसेना कुणाची? खरी राष्ट्रवादी कुणाची? विचारणा राज्यात अजूनही सुरुच आहे. जो तो त्याच्या चष्म्यातून त्याच्यावर तिरकस कटाक्ष टाकतोच म्हणा. पण मोठ्या पवार साहेबांनी त्याचे उत्तर मोठ्या खुबीने दिले आहे. कोल्हापुरात आज सकाळी सकाळीच साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि खरी राष्ट्रवादी कुणाची याचं गणित मांडलं. अर्थात हे गणित आपल्याला आता नवीन नाही, पण मोठ्या पवारांचा आत्मविश्वास या आकड्यांनी दुणावला आहे आणि विधानसभेसाठी त्यांनी जी आकडेवारी मांडली ती महायुतीसाठी धोक्याचा इशारा तर नाही ना? याची राज्यात चर्चा रंगली.

मिशन 8 विरूध्द 1

तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या एका विधानाने काल परवा लोकसभेत गदारोळ झाला. अर्थात त्याचे पडसाद राज्यात दिसले. तटकरे यांनी संसदेत बोलताना अजित पवार गटाची ओरिजिनल राष्ट्रवादी असा उल्लेख केला. त्यावर शरद पवार गोटातून तात्काळ प्रतिक्रिया देण्यात आल्या. तर आज कोल्हापुरात शरद पवार यांनी त्याला खणखणीत उत्तर दिले.

‘ते कळलं ना आता, लोकांनी सांगितले ते, एक माणूस तिकडे निवडून आला. आणि आम्ही 10 पैकी 8 निवडून आलो. तर एक जागा तुतारी आणि पिपाणी या संभ्रमामुळे गेली. नाहीतर 10 पैकी 9 जागा आल्या असत्या.’ असे उत्तर शरद पवार यांनी दिले. पवारांनी राष्ट्रवादी नेमकी कुणाचे याचे उत्तर जनतेने त्यांच्या मतदानातून दिल्याचेच जणू सुचविले. विधानसभेतील स्ट्राईक रेटचा उल्लेख करत त्यांनी हाच फॉर्म्युला कायम राहण्याचे संकेत दिले.

अजित पवार यांची कोंडी?

अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे अनेक आमदार महायुतीत सामील झाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकार राज्याचा मोठा विकास करणार असल्याने विकासाच्या राजकारणासाठी जात असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. पण लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या हाराकिरीचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बसला आहे. एका खासदारावर त्यांना समाधान मानावं लागलं आहे. त्यातच आता भाजप आणि शिंदे सेनेतील अनेक आमदारांनी-खासदारांनी अजित पवारांना महायुती बाहेर काढण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या आमदारांनी पण आता महाविकास आघाडीत अजित पवार नको, अशी भूमिका घेतली आहे. लोकसभेत कमाल कामगिरी करता न आल्याने पवार गटाची महायुतीत बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. आता अजित पवार ही कोंडी कशी फोडतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;