प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बसेस आम्हाला नको, खाजगी बसमालकांचे आंदोलन, 100 बस जमा केल्या
ठाणे – सदोष बसगाड्यांची विक्री केल्यानंतरही त्यांची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष करणे; बस खरेदीदारांच्या समस्या ऐकून न घेणे यामुळे संतप्त झालेल्या मुंबई बस मालक संघटना आणि बस ओनर सेवा संघर्ष समितीचे सदस्य आक्रमक झाले आहेत. या बस मालकांनी सोमवारी मुंबईतली नायगाव येथील कंपनीच्या सर्व्हीस सेंटरवर जाऊन आपल्या 100 हून अधिक बसगाड्या जमा केल्या. विशेष म्हणजे, या बसगाड्या जमा केल्यानंतरही अशोक लेलँडकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने वाहनधारकांनी भरपावसात धरणे आंदोलन केले आहे.
खासगी वाहतूकदारांनी सुमारे एक कोटी रूपये खर्च करून अशोक लेलँड कंपनीने बाजारात आणलेल्या 13. 5 मीटर लांबीच्या बसगाड्या विकत घेतल्या आहेत. मात्र, या बसगाड्या सदोष असल्याने प्रवासादरम्यान अपघातग्रस्त होण्याचा धोका वाढला आहे. या संदर्भात मुंबई बस मालक संघटनेने 13 जून रोजी ठाण्यातील अशोक लेलँड कंपनीच्या प्रशासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. आणि बसेसच्या दर्जाबाबत तक्रार करीत मार्ग काढण्याची विनंती केली होती. मात्र, व्यवस्थापनाने त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केले.
100 बसेस सर्व्हीस सेंटरला जमा केल्या
अशोक लेलॅंड कंपनीच्या अनेक बसगाड्यांचे फ्रंट व्हील हब क्रॅक होणे, व्हील डिस्क तुटणे, क्लच- प्रेशर प्लेट, रिलीझ बेरिंग, क्लच सिलेंडर, डिझेल पाईप तुटणे, सायलेन्सर पाईप फुटणे, पुरवठा करणे करणारे पाईप फुटणे, गियर बॉक्स – ब्रेक लायनर तुटणे या समस्या सुरूच आहेत. विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यातच या समस्या निर्माण झाल्या आहेत. अशोक लेलँड कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा किंवा वॉरंटी दिली जात नाही. त्यामुळे हताश झालेल्या सुमारे 100 बस मालकांनी आज थेट सर्व्हीस सेंटर गाठून आपल्या बसगाड्या त्यांना परत केल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List