Konkan Graduate Constituency : मोठी बातमी, कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार, पडद्यामागे काय राजकारण घडलं? VIDEO
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती. पण आता अचानक मनसेने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. नितीन सरदेसाई यांनी मीडियाशी बोलण्याआधी भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. “प्रत्येक निवडणुकीची एक थिअरी असते. महायुती एकत्र राहील असा विश्वास आहे. बरेच वर्षाचे संबंध आहेत. मी आशिर्वाद घ्यायला आलो होतो” असं निरंजन डावखरे म्हणाले. “देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती, त्या विनंतीला मान देऊन आम्ही माघार घेत आहोत” असं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं. अभिजीत पानसे यांनी कोकण पदवीधरची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती. सातत्याने ते नोंदणी करुन घेत होते. राज ठाकरेंनी सुद्धा या निवडणुकीत लक्ष घातलं होतं.
मनसेने हा निर्णय का घेतला? त्या बद्दल नितीन सरदेसाई यांनी माहिती दिलीय. “दोन दिवसापूर्वी 3 जूनच्या संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली, त्या विनंतीला मान देऊन राज ठाकरे यांनी कोकण पदवीधरची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. पानसे अर्ज भरणार नाहीत, निरंजन डावखरे उमेदवार असतील” असं नितीन सरदेसाई म्हणाले.
‘त्या बद्दल राज ठाकरेच बोलतील’
“आज सकाळी निरंजन डावखरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यांनी राज ठाकरे यांचा आशिर्वाद घेतला. त्यानंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं” असं सरदेसाई म्हणाले. तुम्ही निरंजन डावखरे यांना समर्थन देणार का? या प्रश्नावर नितीन सरदेसाई म्हणाले की, “त्या बद्दल राज ठाकरेच बोलतील. पण अशी गोष्ट वारंवार होणार नाही” “देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हा निर्णय घेतलाय. आमचा स्वतंत्र पक्ष आहे. या वेळेला पाठिंबा दिला आहे. अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही, हे सुद्धा स्पष्ट केलय” असं नितीन सरदेसाई म्हणाले.
‘मनसेच्या बाबतीत असं वारंवार का होतं?’
मनसेची तयारी नव्हती का? मनसेच्या बाबतीत असं वारंवार का होतं? या प्रश्नावर नितीन सरदेसाई म्हणाले की, “राजकारणात बऱ्याच गोष्टी असतात. पक्षासाठी होणारा फायदा कालांतराने दिसतो”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List