PM Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दिला धोका, म्हणून…
वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा विजय मिळाला. पण, त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी मोदींना चांगली लढत दिली. ही परिस्थिती काही वाराणसीमध्येच नाही. संपूर्ण देशात कॉंग्रेसची कामगिरी गेल्या दोन निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत अधिक उंचावली आहे. त्यामुळेच भाजप हायकमांडने बूथनिहाय आढावा घेण्याच्या सूचना नेत्यांना देण्यात आल्या आहेत. पक्षाचे लोकप्रतिनिधी, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याकडून बूथनिहाय मतांची माहिती मागवली जात आहे. त्यातच लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी हायकमांडने स्वत: जबाबदारी घेऊन अशा लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी सुरु केलीय. मोदी यांच्या विजयाचे अंतर कमी झाल्याने आता पक्षातच गटबाजीचे आरोपही होऊ लागले आहेत. मात्र, मोदी यांच्या विजयाचे अंतर कमी करण्यात कोणते घटक कारणीभूत ठरले ते पहाणे महत्वाचे आहे.
दक्षिण रोहनिया आणि सेवापुरी शहरात अजय राय यांच्या बाजूने मतदान
वाराणसी लोकसभा निवडणुकीच्या निकालाने बरेच काही स्पष्ट केले आहे. भाजपने उत्तर प्रदेशमध्ये ज्या समुदायांवर विश्वास ठेवला. त्यांना सामाजिक प्रवाहात सामावून घेतले. त्यांनीच धोका दिला असे हे निकाल स्वतःच सांगत आहेत. त्यामुळे निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे अंतर तीन लाखांपेक्षा कमी होणे यात आश्चर्यकारक असे काही नाही. लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी कॉंग्रेसचे उमेदवार अजय राय विरुद्ध पंतप्रधान मोदी यांच्यातील लढत चुरशीची करण्यासाठी भाग घेतला. पाच विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ दक्षिण शहर मतदारसंघात पंतप्रधान मोदी यांना एक लाख मतांचा टप्पा ओलांडता आला नाही. तर, रोहनिया आणि सेवापुरी विधानसभा मतदारसंघ जे भाजपचे मजबूत बालेकिल्ले मानले जात होते ते पक्ष बदलून इंडिया आघाडीसोबत उभे असल्याचे दिसून आले. अजय राय यांना एकूण मतांपैकी 40.74 टक्के मते मिळाली जी काँग्रेसच्या 72 वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक मतांची टक्केवारी आहे.
वाराणसीचे खासदार पंतप्रधान मोदीं गेली 10 वर्षे मग तो ड्रीम प्रोजेक्ट काशी विश्वनाथ धाम असो किंवा गंगा घाटांना नवा लूक देण्याबरोबरच नवीन नमो घाट बांधणे असो किंवा पक्का महल (जुने शहर) च्या परिसरांना स्मार्ट बनवणे आणि इतर कामे असो. ही सर्व कामे दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या खात्यात आहे. मात्र, असे असूनही सिटी साउथच्या मतदारांनी पंतप्रधान मोदी यांना एक लाखापेक्षा कमी म्हणजेच 97 हजार 878 मते दिली. तर, कॉंग्रेसचे उमेदवार अजय राय यांना 81 हजारांहून अधिक मते मिळाली. पोस्टल बॅलेटमध्येही अजय राय हे पंतप्रधान मोदींपेक्षा काही मतांनी मागे होते. पीएम मोदी यांना 1531 आणि अजय राय यांना 1373 मते मिळाली आहेत.
भूमिहार पटेलांनी बाजी पालटली
वाराणसी लोकसभा मतदारसंघातील सेवापुरी आणि रोहनिया विधानसभेत भूमिहार आणि पटेल मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या निवडणुकीत या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या प्रचंड मतांनी पंतप्रधान मोदी यांच्या विजयाचे अंतर वाढले होते. भूमिहार मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने निवडणुकीपूर्वी धर्मेंद्र राय यांना आमदार केले. तर, वाराणसी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक संचालकाची महत्त्वाची जबाबदारी माजी आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांना दिली. भाजपच्या प्रभारी अश्विनी त्यागी याही याच समाजाच्या आहेत. एवढेच नव्हे तर प्रचारात भूमिहार नेत्यांना अधिक पसंती देण्यात आली. सेवापुरी आणि रोहनिया येथील प्रत्येक भूमिहार मतदाराच्या घरी सलग दोन महिने भूमिहार नेते पोहोचत होते. अपना दल (एस) नेते पटेल मतदारांना आकर्षित करत होते. ही दोन क्षेत्रे पीएम मोदी यांचा अड्डा बनतील असे वाटले होते. पण, जेव्हा ईव्हीएम मशीनचा पेटारा उघडला तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. अजय राय यांना पाठिंबा देण्यात आदिवासी बांधवांसोबत पटेल समाजही मागे राहिला नाही हे मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
| उमेदवार | नरेंद्र मोदी | अजय राय | मतांचा फरक |
| शहर दक्षिण | 97878 | 81732 | 1032 |
| शहर उत्तर | 131241 | 101731 | 4173 |
| वाराणसी कॅन्ट | 145922 | 87645 | 3423 |
| रोहनिया | 127508 | 101225 | 10527 |
| सेवापुरी | 108890 | 86751 | 14491 |
मोदींच्या विजयात कँटचा मोठा वाटा आहे
वाराणसीमधून पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्यांदा दीड लाख मतांनी विजय मिळवण्यात कँट विधानसभेच्या मतदारांचा मोठा वाटा आहे. पाच विधानसभा मतदारसंघांपैकी पंतप्रधान मोदींना कॅन्टमध्ये सर्वाधिक 1.5 लाख मते मिळाली. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथेही पंतप्रधान मोदींच्या बाजूने मतदान झाले. अजय राय यांच्यासोबत एकतर्फी असलेल्या लढतीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या विजयाचे अंतर कमी करण्यात शहर दक्षिणेतील मुस्लिम मतदारांनी मोठी भूमिका बजावली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List