Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : फोडाफोडी भोवली, BJP सिंगल डिजीटवर , पाहा Video

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : फोडाफोडी भोवली, BJP सिंगल डिजीटवर , पाहा  Video

बारामती लोकसभेत भोर विधानसभा वगळता, पुरंदर-इंदापूर-बारामती-दौंड-खडकवासला या पाचही ठिकाणी महायुतीचे आमदार होते. पण जनतेनं सुप्रिया सुळेंना कौल दिला. शिरुर लोकसभेतले जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, भोसरी आणि हडपसरचे सहाही आमदार महायुतीचे होते. तरी विजय शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंचा विजय झाला. नाशिक लोकसभेतले सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, इगतपुरी इथले सर्व आमदार महायुतीचे होते. मात्र विजय एकही आमदार नसलेल्या ठाकरे गटाचा झाला.

दिंडोरी लोकसभेतले नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड आणि दिंडोरी या सहाही विधानसभेतले आमदार महायुतीचे होते. तरी विजय एकही आमदार नसलेल्या शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंचा झाला. शिवसेना फुटीनंतर १८ पैकी उद्धव ठाकरेंकडे फक्त 5 खासदार उरले होते. उर्वरित १३ खासदार शिंदे गटात गेले. निकालानंतर ठाकरेंचे खासदार ५ वरुन ९ झाले., आणि शिंदेंचे १३ वरुन 7 अखंड असूनही 2019 मध्ये राष्ट्रवादीला फक्त 4 जागा मिळाल्या. यंदा पुतणे अजित पवारांसहीत दिग्गज फुटूनही शरद पवारांना ८ खासदार मिळाले आणि अजितदादांना फक्त एक.

बडे चेहरे असूनही 2019 ला काँग्रेस फक्त १ खासदार मिळवू शकली. यंदा अनेक चेहरे फुटूनही काँग्रेसचे 1 वरुन १३ खासदार झाले. 2019 ला फक्त उद्धव ठाकरेंसोबत युती असणाऱ्या भाजपनं 23 खासदार जिंकले होते. यंदा शिंदे-अजित पवार-बिनशर्त पाठिंब्यानं राज ठाकरे सोबत असूनही भाजप 23 वरुन 9 जागांवर खाली आली. गेल्या विधानसभेत ऐनवेळी मूळ बीडच्या राम सातपुतेंना भाजपनं माळशिरसमध्ये उमेदवारी दिली. मोहिते समर्थकांनी त्यांना जिंकवून आणलं. मात्र फर्स्ट टर्म आमदार झाल्यानंतरच राम सातपुतेंवर अनेक योजनांचे श्रेय लाटण्याचे आरोप झाले., सभांमधून सातपुतेंच्या भाषणात अहंकारही झळकत होता. धर्मा माने नावाच्या समर्थकाला दिलेला दमही विशेष गाजला. मात्र याच धर्मा मानेच्या कनेर गावातून तुतारीवर लढलेल्या धैर्यशील मोहितेंना 350 मतांचं लीड मिळालंय. एक व्यक्ती किंवा एक पक्ष जनतेवर उपकार करतो, या आशयाची भाषा लोकांना रुचली नाही. यानंतर माढ्यात आव्हान-प्रतिआव्हानांचाही सामना रंगला.

देशात सत्तेत असलेल्या पक्षाच्या उमेदवारानं एखाद्या नवख्या कार्यकर्त्याप्रमाणे घोषणा देत धार्मिक ध्रुवीकरण करावं, हे देखील सोलापूरकरांना रुचलं नाही. माढा-सोलापूरकरांनी दमदाटीचंही राजकारण नाकारलं. 26 एप्रिलला पंढरपूरचे अभिजीत पाटील मविआच्या सभेत होते. त्याच दिवशी 2021 च्या प्रकरणात त्यांच्या कारखाना सील केला गेला. 28 एप्रिलला फडणवीसांसोबत पाटलांची भेट झाली. 29 एप्रिलला अभिजीत पाटील महायुतीच्या प्रचारात सामील झाले आणि चमत्कारिकरित्या 2 दिवसांनीच कारखान्याची जप्ती उठवली गेली. त्यात कट्टर फडणवीस समर्थक सदाभाऊ खोतांच्या सभांमधल्या विधानांनी फायद्याऐवजी भाजपचं नुकसानच अधिक झालं.

स्वतः अशोक चव्हाण आणि त्यांचे वडील ज्या काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले., त्यांनी ऐनवेळी केलेला भाजपप्रवेशाविरोधात नांदेडवासियांनी कौल दिला. कारवायांच्या भीतीनं चव्हाण भाजपवासी झाल्याची चर्चाही निवडणुकीत फॅक्टर ठरला. अखेर नाव ”अशोक” असूनही चव्हाण नांदेडमधली भाजपची पानगळ रोखू शकले नाहीत. आणि काँग्रेसच्या दुसऱ्या चव्हाणांनी नांदेडात ‘वसंत’ फुलवला. खुद्द अशोक चव्हाणांच्याच मतदारसंघात काँग्रेसनं लीड घेतलं. तूर्तास अशोक चव्हाण राज्यसभा मिळवून सेफ आहेत. पण त्यांच्या प्रवेशानंतरही नांदेड गमावून भाजपनं काय साध्य केलं, हा संशोधनाचा विषय ठरेल.

पुण्यात वंचितच्या वसंत मोरेंना तर त्यांच्या फेसबूक फॉलोअर्स इतकीही मतं न पडल्याची पोस्ट व्हायरल झाली. मोरेंच्या फेसबूक पेजला ५ लाख ६७ हजार लोक फॉलो करतात. मात्र विजयाचा दावा करणाऱ्या मोरेंना अवघी ३२ हजार १२ मतं पडली. दुसऱ्या पक्षातून नेता सोबत घेतल्यावर जनताही सोबत येते, हा भाजपचा भ्रम प्रकाश आंबेडकरांनाही झाला. वसंत मोरेंना तिकीट देण्यामागे प्रकाश आंबेडकरांनी गणित मांडलं होतं की, राज ठाकरेंच्या भोंगा आंदोलनाविरोधात वसंत मोरेंनी विरोधात भूमिका घेतली.
त्यामुळे 2 लाख मतं वसंत मोरेंच्या खिशात आहेत. म्हणून असा उमेदवार का सोडावा? पण लोकशाहीत मतं नेत्याच्या खिशातून नाही तर जनतेतून येतात., हे पुन्हा महाराष्ट्राच्या निकालानं सिद्द केलं.

पाहा व्हिडीओ:-

यंदा स्वतः महायुतीच्या नेत्यांच्याच विधानं आणि प्रचारही नकारात्मक राहिला. आमच्यावर नाराजी असेल पण मोदींकडे पाहून मतं द्या., असा खुद्द उमेदवारांनीच केलेला प्रचार अनेकांना खटकला. वास्तविक 2019 ला मोठं संख्याबळ असूनही गेल्यावेळी पराभूत जागांवरची फोडाफोडी भाजपच्या प्रतिमेवर प्रश्न उभे करणारी ठरली. 2019 ला नांदेड लोकसभेत अशोक चव्हाण अवघ्या 40 हजारानं पडले. वंचितनं घेतलेली 1 लाख 66 हजार मतांचा यात वाटा होता. यंदा नांदेडची जागा भाजपसाठी अवघड असल्याचा दावा प्रवेशाआधीच्या ४० दिवसांपूर्वी खुद्द चव्हाणच करत होते. पण फडणवीस-शिंदे सरकारनं विरोधातल्या अशोक चव्हाणांच्या कारखान्याला 147 कोटींची हमी दिली. त्याच्या काही महिन्यात अशोक चव्हाण भाजपात गेले…दुसऱ्याच दिवशी राज्यसभेत खासदार झाले. मात्र नांदेडचा पराभव रोखू शकले नाहीत.

2019 ला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं अपक्ष लढलेल्या नवनीत राणा जिंकल्या. जिंकल्यानंतर त्यांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं. यंदा त्यांच्या विरोधातल्या अडसूळांची समजूत घालून भाजपला विजयाची आशा होती. मात्र नवनीत राणाही पराभूत झाल्या. मोदी लाटेतही बारामतीचा गड भाजपला सर करता आला नाही. यंदा अजित पवारांना सोबत घेवून त्यांच्याच पत्नीला तिकीट दिलं गेलं. आमदारांचं संख्याबळ, सत्ता, योजनांचं भविष्य, कारखान्यांचं गणित सगळं काही महायुतीच्या बाजूनं होतं. तरी बारामतीत लाखांहून जास्त मतांनी पराभव झाला.

मुंबई दक्षिणमध्ये ठाकरे गटात असताना भाजपनंच आरोप केलेल्या यामिनी जाधवांना तिकीट दिलं. म्हणजे ज्यांच्या आरोपांमुळे जाधवांवर छापे पडले, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ भाजपवर आली. मोदींकडे बघून मतं मिळतील, असा अनेकांचा होरा होता., पण तो ही फेल ठरला. मुंबई उत्तर पश्चिम महायुतीकडे उमेदवार नव्हता. भाजपच्या आरोपांनी ईडीचा छापा पडलेल्या वायकरांनाच प्रवेश देवून तिकीट दिलं गेलं मात्र पोस्टल मतांमध्ये अवघ्या ४८ मतांनी त्यांचा विजय झाला. जो वाद अजूनही सुरुय.

रामटकेच्या जागेसाठी महायुतीनं काँग्रेस आमदार राजू पारवेंना फोडून त्यांनाच तिकीट दिलं. नंतर काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वेंच्या जातपत्रावर भाजपनं आक्षेप घेतल्यानं त्यांची उमेदवारी रद्द झाली. डमी उमेदवार म्हणून रश्मी बर्वेंचे पती शामकुमार बर्वे काँग्रेसचे उमेदवार बनले. आणि जिंकूनही आले. काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेल्या पारवेंची आमदारकीही गेली. खासदारकीचंही स्वप्न अधुरं राहिलं. निवडणुका नेत्यांच्या नव्हे तर लोकांच्या मुद्द्यांवर आणि लोकांच्याच भरवश्यानं लढवल्या जातात. हा साधा सोपा आणि सरळ संदेश महाराष्ट्रानं यंदा दिलाय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;