भिवंडी लोकसभा निकाल 2024 : भिवंडीत कमळ फुलणार की तुतारी वाजणार ? कपिल पाटील वि. बाळ्यामामा लढतीत कौल कोणाला ?
लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यात २० मे रोजी देशभरासह महाराष्ट्रात मतदान पार पडले. भिवंडी, नाशिक, मुंबई यासह महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदान झालं. भिवंडीत मविआतर्फे राष्ट्रवादीला जागा मिळाली आणि सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्यामामाला राष्ट्रवादीने तिकीट दिलं. तर महायुतीतर्फे ही जागा भाजपच्या पारड्यात पडली आणि कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा संधी दिली. भिवंडीत दुहेरी लढत होईल असं वाटत असताना निलेश सांबरेंनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने ही लढत तिहेरी झाली. भिवंडीत कमळ फुलणार की तुतारी वाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कपिल पाटील तिसऱ्यांदा जिंकणार की बाळ्यामामा बाजी मारणार ?
कपिल पाटील यांना भाजपाने 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळेला संधी दिली होती. ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे यंदाही ते विजय मिळवत हॅटट्रिक साधतात का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीनेही तुल्यबळ उमेदवार दिला. सुरेश म्हात्रे हे भिवंडीतील स्थानिक नेते असून त्यांना कपिल पाटील यांच्याप्रमाणेच आगरी समाजाचा पाठिंबा आहे. आगरी समाजातील तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बाळ्या मामा अर्थात सुरेश म्हात्रेंनी मनसेत प्रवेश केला. मात्र कपिल पाटील यांनी त्यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हरवलं. ज्यानंतर त्यांनी पुन्हा मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला. सुरेश म्हात्रे यांनी 2014 ते 2024 या दहा वर्षांत सातवेळा पक्ष बदलले आहेत. भिवंडीकर आज कुणाला कौल देणार ते आज स्पष्ट होईल.
या जागेच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर 2009 मध्ये येथे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसने सुरेश तावरे यांना तर भाजपने जगन्नाथ पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर मनसेने देवराज म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश तावरे यांना 1,82,789 तर भाजपच्या जगन्नाथ पाटील यांना 1,41,425 मते मिळाली होती. तर मनसेचे देवराज मात्रे यांना 1,07,090 मते मिळाली. काँग्रेस आणि भाजपच्या विजय आणि पराभवात 41 हजार 364 मतांचा फरक होता.
भिवंडी किती टक्के मतदान ?
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी ठाणे जिल्ह्यातही मतदान झालं. भिवंडी लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 पासूनच मतदानाला सुरूवात झाली. भिवंडी मतदारसंघात एकूण 59.89 % मतदान झालं.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List