सोलापूर लोकसभा निकाल 2024 : दोन आमदारांची लढाई, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे की भाजपचे राम सातपुते ?
सोलापूर लोकसभा मतदारसंघात ( Solapur loksabha Constituency ) या वेळी विधानसभेतील दोन प्रतीस्पर्धी आमदार एकमेकांविरोधात निवडणूक लढवीत होते. त्यातील पहिल्या म्हणजे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे ( Congress Candidate MLA Praniti Shinde ) त्यांच्याविरोधात भाजपनेही मोठी खेळी खेळत विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांना डावलून आमदार राम सातपुते ( BJP Candidate MLa Ram Satpute ) यांना उमेदवारी दिली. सोलापूर मतदार संघात यावेळी 53.91 टक्के मतदान झाले आहे.
2019 मध्ये माजी मंत्री आणि खासदार सुशीलकुमार शिंदे यांचा वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे पराभव झाला. प्रकाश आंबेडकर यांना 1 लाख 70 हजार मते मिळाली होती. तर, भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांना 5 लाख 24 हजार आणि सुशीलकुमार शिंदे यांना 3 लाख 66 हजार मते मिळाली होती. 2024 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना संधी दिली. तर, भाजपनेही आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देऊन उमेदवार बदलण्याची परंपरा कायम ठेवली होती.
कोण आहेत भाजप आमदार राम सातपुते?
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत. 2019 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.
विधानसभेच्या कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे
आमदार प्रणिती शिंदे यांचा सोलापूर शहर मध्यवर्ती हा मतदार संघ 2009 मध्ये तयार झाला. पहिल्याच निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी 34 हजार मतांची आघाडी घेतली होती. 2014 मध्ये मतांची आघाडी घसरून 9 हजारांवर आली. मात्र, 2019 मध्ये पुन्हा 13 हजारांनी लीड वाढला.
सुशीलकुमार शिंदे यांचा मतदारसंघ
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचे राज्यपाल, भारताचे गृहमंत्री, सलग साडे सहा वर्षे केंद्रीय ऊर्जामंत्री, लोकसभेचे नेते असा प्रचंड अनुभव असणारे सुशीलकुमार शिंदे यांचा हा मतदारसंघ. 1998 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून ते लोकसभेत गेले. 2003 मध्ये टर्म पूर्ण होण्याआधीच त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी लोकसभेचा राजीनामा द्यावा लागला. रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रतापसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. 2004 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांनी निवडणूक लढविली. पण, भाजपचे सुभाष देशमुख यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनी विजय मिळविला. 1998 ते 2009 या काळात त्यांनी सोलापूरमधून विजय खेचून आणला होता. 2014 मध्ये मात्र या विजयी परंपरेला छेद मिळाला. देशात मोदी लाटेत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला त्यात सुशीलकुमार शिंदे यांचाही समावेश होता. त्यावेळी भाजपचे शरद बनसोडे निवडून आले. नंतर 2019 च्या निवडणुकीतही शिंदे यांचा भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पराभव केला होता.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List