रावेर लोकसभा निकाल 2024 : रक्षा खडसे की श्रीराम पाटील, कौल कुणाला?
रावेर लोकसभा मतदारसंघ या लोकसभा निवडणुकीत चांगला चर्चेचा ठरला. या मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत. रक्षा खडसे यांचा 2019 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विजय झाला होता. त्याआधी देखील भाजपचेच उमेदवार हरिभाऊ जावळे हे जिंकून आले होते. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापून रक्षा खडसे यांना तिकीट देण्यात आलं होतं. रक्षा खडसे यांचा या निवडणुकीत विजय झाला होता. या मतदारसंघाची 2009 मध्ये निर्मिती झाली होती. रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी जास्त चुरशीची ठरली. कारण या लोकसभा निवडणुकीत भाजपच्याच कार्यकर्त्यांनी रक्षा खडसे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. रक्षा खडसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. तसेच शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात गेलेले आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे रक्षा खडसे यांना या निवडणुकीत कितपत फायदा झाला? ते आज स्पष्ट होणार आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात थेट लढत झाली. या मतदारसंघात रक्षा खडसे गेल्या 10 वर्षांपासून भाजपच्या खासदार आहेत. तर शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पवार हे भाजप पक्षात होते. त्यांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.
गेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काय?
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनीष जैन यांचा 3,18,060 मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. यानंतर 2019 मध्ये भाजपने पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली. खडसे पुन्हा एकदा विजयी होऊन खासदार झाल्या. काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास वासुदेव पाटील दुसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 3,19,504 मते मिळाली होती.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघात एकूण 18 लाख 12 हजार 616 मतदार होते. या मतदार संघात एसटी प्रवर्गाचे सर्वाधिक मतदार आहेत. रावेरच्या एकूण लोकसंख्येमध्ये सुमारे 14.6 टक्के एसटी प्रवर्गाचे मतदार आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुस्लिम मतदार 14.5 टक्के आहे. एससी प्रवर्गाचे ( अनुसूचित जाती ) मतदार 11.3 टक्के आणि बौद्ध 5.19 टक्के आहेत.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List