वडील चोरला, वडील चोरला म्हणता… राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला काय?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक भाषणात एकनाथ शिंदे यांनी माझे वडील चोरले असं म्हणत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. तुम्ही वडील चोरला वडील चोरला म्हणता… सुषमा अंधारे तुमच्या वडिलांना 80 वर्षाचा म्हातारा म्हणाल्या. त्या आज तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. हेच का तुमचं वडिलांवर प्रेम? ज्या भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसला. तेव्हा कुठे होते तुमचे प्रेम? अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कळव्यात सभा झाली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. वडील चोरले… वडील चोरले म्हणता ना? मी एकच क्लिप दाखवायला आणली आहे. मी एकदाच लाव रे व्हिडीओ केला होता. तेव्हा सर्वांनी तेच सुरू केलं. आता सांगतो लाव रे तो व्हिडीओ…( यावेळी सुषमा अंधारे यांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला.) यांच्या अनेक क्लिप्स आहेत. मला त्याचं काही देणंघेणं नाही. 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार दिल्यावर हात लटलटणार असं म्हणणारी ही बाई तिला तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्ते करता? आणि बाळासाहेबांवर प्रेम आहे म्हणून सांगता?, असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला.
मी सांगून बाहेर पडलो
छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसला. तेव्हा माझ्या वडिलांना अटक करायला लावणाऱ्या माणसासोबत बसणार नाही असं वाटलं नाही? कसलं फोडाफोडीचं राजकारण करता? मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. मी त्यांना मिठी मारली. म्हटलं, येतो मी. ते म्हणाले, काय करणार आहेस? मी म्हटलं, मला माहीत नाही. पण निश्चित मनात होतं, बाळासाहेब सोडून कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. कितीही चढउतार आले तर मार्ग काढीन त्यातून. यांनी काय पाहिलं? असा सवाल त्यांनी केला.
तेव्हा का आक्षेप घेतला नाही
उद्धव ठाकरे यांना सिंपथी मिळाल्याचं मध्यंतरी सुरू होतं. दोन अडीच वर्षापूर्वीचा काळ काढून बघा. भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवली. तुम्हाला लोकांनी युती म्हणून मतदान केलं. निकाल लागल्यानंतर आपल्याशिवाय सरकार होतनाही लक्षात आल्यावर अडीच अडीच वर्षाची टूम काढली. चार भिंतीत ठरलं असं सांगितलं. मग आधी का बोलला नाही? मोदींची सभा व्हायची. हे व्यासपीठावर उपस्थित असायचे. मोदी म्हणयचे, फडणवीस आमचे पुढचे मुख्यमंत्री असणार. का नाही आक्षेप घेतला? अमित शाहही तेच म्हणायचे. का नाही आक्षेप घेतला? करार बद्दल आधी का नाही सांगितलं? लाखो लोकांची मते वाया घालवली. ज्यांच्या विरोधात लढला त्यांच्यासोबत बसला, असा हल्लाच त्यांनी चढवला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List