Bhendval Prediction : देशाचा राजा कायम राहणार? बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळचं भाकित काय
माणसाला भविष्याची चिंताच असते असे नाही तर भविष्यातील घडामोडीची उत्सुकता पण असते. भविष्यातील घडामोडींचा अगोदरच अंदाज जाणून घ्यायचा असतो. बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळचे भाकित काय ते पाहण्यासाठी विदर्भासह खानदेश आणि जवळच्या मध्यप्रदेशातून पण बरीच मंडळी ठाण मांडून असतात. यंदा लोकसभा निवडणुकीचा बार उडालेला आहे. जनता मतपेटीतून त्यांचा उमेदवार निवडून देईल. पण देशाचा राजा कोण होणार याची उत्सुकता आहे. याविषयी भेंडवळची भविष्यवाणी आहे तरी काय?
300 वर्षांची परंपरा
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भेंडवळ हे गाव आहे. येथे दरवर्षी घटमांडणी करण्यात येते. याच घट मांडणीला भेंडवळचं भाकीत असं म्हणतात. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही घट मांडणी होते. आज शनिवारी सकाळीच भेंडवळची भविष्यवाणी करण्यात आली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी घट मांडणी केली. यामध्ये 18 प्रकारचे धान्य आणि मध्यभागी एक गोल खड्डा करुन त्यात मटकी ठेवली जाते. रात्री ज्या हालचाली होतात, त्याचे सकाळी निरीक्षण करुन अंदाज वर्तविला जातो.
राजकीय भाकितावर संकट
घटमांडणी होण्यापूर्वीच वाद उफाळला होता. अखिल भारतीय संघटनेचे जिल्हा संघटक अभयसिंह मारोडे यांनी ही घटमांडणी थोतांड आणि अवैज्ञानिक असल्याचा दावा केला होता. शेतकऱ्यांनी या मांडणीच्या भाकितांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. घटमांडणीत दरवर्षी राजकीय भाकीत केले जाते. यंदा लोकसभा निवडणुका होत असल्याने सर्वत्र आचारसंहिता लागू आहे. राजकीय भाकीत केल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा मारोडे यांनी दिला होता. त्यामुळे यंदा राजा कायम राहिल इतकीच चर्चा झाली.
राजा असेल कायम
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. चौथ्या टप्प्याकडे निवडणुका वळल्या आहेत. तीन टप्प्यात कमी मतदानाने चिंता वाढलेली आहे. तर देशात कोणत्या पक्षाचे सरकार येणार, कोण पंतप्रधान होणार, जनता कुणाच्या पारड्यात मताचा कौल टाकणार याविषयीची कमालीची उत्सुकता आहे. भेंडवळच्या भाकितानुसार, देशातील राजा कायम असेल. तर देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत असेल. शत्रू राष्ट्रांच्या कारवाया यावर्षी होणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List