बाळासाहेबांना दिलेली शपथ नारायण राणे यांनी मोडली; उद्धव ठाकरे यांच्याबाबत खळबळजनक गौप्यस्फोट काय?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी शपथ दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर काही बोलत नाही, असं रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील भाजपचे उमेदवार नारायण राणे वारंवार सांगत असतात. पण नारायण राणे यांनी आज बाळसाहेब यांना दिलेली शपथ मोडली आहे. ही शपथ मोडल्यानंतर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना जिवंतपणी प्रचंड यातना दिल्या होत्या असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
रत्नागिरीत एका सभेला संबोधित करताना नारायण राणे यांनी हा आरोप केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना दिलेली शपथ मोडून राणे यांनी उद्धव ठाकरेंचा किस्सा सांगितला आहे. आयुष्यात सर्वात जास्त त्रास मला उद्धवने दिल्याचे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे. बाप चोरला म्हणून बोंबा मारणाऱ्या उद्धव यांनी बाळासाहेबांना जिवंतपणी प्रचंड त्रास दिला होता. उद्धव ठाकरे तिसरा मजला सोडून कधी दुसऱ्या मजल्यावर गेलेच नाही, असा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.
तर सर्व कारनामे उघड करेन
उद्धव ठाकरे 21 दिवस परदेशात होते. याकाळात बाळासाहेबांना एखादा फोन करण्याचं सौजन्य उद्धव ठाकरे यांनी दाखवलं नाही. उद्धव ठाकरे यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. नाही तर लोकसभा निवडणुकीनंतर शिवाजी पार्कवर सभा घेऊन सर्व कारनामे उघडे करेन, असा इशाराच नारायण राणे यांनी दिला आहे.
दोनवेळा मातोश्री सोडली…
उद्धव ठाकरे दोन वेळा मातोश्री सोडून गेले होते. त्यांना मी घरी परत आणलं होतं. मी बोलतोय ते सत्य आहे. असत्य असेल तर उद्धव ठाकरेंनी सांगावं, असं आव्हानच राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं. तसेच मोदींवर टीका सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मोदींना तडीपार करायला निघाले
महायुतीची मतं कशी वाढतील यासाठी प्रयत्न करा. ही निवडणूक देशासाठी खूप महत्त्वाची आहे. नरेंद्र मोदी हॅट्रिक पूर्ण करतील. मोदी देशाची अर्थव्यवस्था वाढवायला निघाले आहेत. विरोधी पक्ष मोदींना तडीपार करायला निघाला आहे. कोण विरोधी पक्ष समोर उभा आहे? विरोधी पक्ष नेता पण त्यांच्याकडे नाही, असा हल्ला त्यांनी चढवला.
निवडणुकीनंतर ठाकरे गट शून्य
शरद पवार यांचे खासदार किती तीन? उद्धव ठाकरेचे खासदार पाच आहेत. या निवडणुकीनंतर शून्य होईल. विरोधकांचे सर्व मिळून 55 खासदार आहेत. आम्ही 300च्यावर आहोत. इकडून तिकडे फिरणारा राऊत देशाचं संरक्षण करणार का?, असा सवाल त्यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List