धनंजय मुंडे यांचं बहिण पंकजा यांच्याबाबत मोठं विधान; म्हणाले, त्या केंद्रात मंत्री…
लोकसभा निवडणुकीदरम्यावन सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ… या मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचं लक्ष आहे. प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यंदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बजरंग सोनवणे यांच्यात ही लढत होत आहे. पंकजा यांचा प्रचार करण्यासाठी त्यांचे बंधू, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे देखील मैदानात आहेत. आज प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे बीडमध्ये येताना केंद्रीय मंत्री म्हणून येतील, असं धनंजय मुंडे म्हणाले.
बजरंग सोनवणे यांना टोला
आज समोरील उमेदवार हे जातीपातीचे राजकारण करत आहे. त्यांनी अगदी सुरुवातीलाच स्वतःचे कुणबी प्रमाणपत्र काढून घेतलं. त्यावर कोणाचाही आक्षेप नाही. मात्र स्वतःचं कुणबी प्रमाणपत्र गुपचूप काढून घेऊन त्याचा राजकीय लाभ एका निवडणुकीत घेतला. त्याऐवजी वीस – पंचवीस हजार गोरगरीब आणि गरजू लोकांना या कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळवून दिला असता तर खरंच यांच्या मनाचा मोठेपणा आम्ही पाहिला असता. आता त्यांनी त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसी विरूद्ध मराठा अशी लढत नसून ओबीसी विरूद्ध ओबीसी अशीच लढत होत आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांना टोला लगावला आहे.
मोदींच्या कामाचं कौतुक
भारत देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कोरोना महामारीच्या काळात अनेक इतर देशांना मदत केली. आज कोट्यावधी कुटुंबांना मोफत राशन दिलं जातं. ते सुद्धा कोणाचीही जात किंवा धर्म न पाहताच दिलं जातं. याही पलीकडे जाऊन नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. त्याच प्रकारची प्रगती आणि विकास बीड जिल्ह्याला अपेक्षित आहे. आता बीड जिल्हा सुद्धा जात-पात धर्म या गोष्टींना थारा न देता कर्तृत्व अंगी असलेल्या आणि विकासाची क्षमता असलेल्या नेतृत्वालाच बीडची जनता लोकसभेत पाठवणार आहे, धनंजय मुंडे म्हणाले.
पाणी प्रश्नावर भाष्य
मराठवाड्याचं 165 टीएमसी पाण्याचे तुटीचे खोरे भरून काढण्याचा प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे तयार आहे. यासाठी सुमारे एक लाख 17 हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी खेचून आणवा लागेल. बँकेकडून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी केंद्रात वजन असलेला खासदार आपल्याला निवडून द्यावा लागेल. या तुटीतून सुमारे 42 टीएमसी पाणी हे आपल्या बीड जिल्ह्याला मिळणार आहे. हे पाणी आल्यानंतर बीड जिल्ह्यात मोठी जलक्रांती होणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना लोकसभेत पाठवणं गरजेचं आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List