भारतीय पुरुष हॉकी संघाचा सलग चौथा पराभव
वृत्तसंस्था/ पर्थ
यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेत भारताच्या पुरुष हॉकी संघाची कामगिरी आतापर्यंत असमाधानकारक झाली असून त्याना सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मालिकेतील शुक्रवारी झालेल्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
शुक्रवारचा हा चौथा सामना पावसाळी हवामानामुळे निर्धारित वेळेपेक्षा 40 मिनिटे उशिरा सुरू करण्यात आला. या सामन्यातील नोंदवले गेलेले चारही गोल पेनल्टी कॉर्नरवरचे आहेत. या सामन्यात 12 व्या मिनिटाला भारताने आपले खाते उघडले. कर्णधार हरमनप्रित सिंगने पेनल्टी कॉर्नरवर हा गोल केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या जेरेमी हेवर्ड्सने दोन गोल तर जॅक वेल्चने एक गोल केला. हेवर्ड्सने 19 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाचे खाते पेनल्टी कॉर्नरवर उघडून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 47 व्या मिनिटाला हेवर्ड्सने ऑस्ट्रेलियाचा दुसरा पेनल्टी कॉर्नरवर केला. 54 व्या मिनिटाला जॅक वेल्चने ऑस्ट्रेलियाचा तिसरा आणि शेवटचा गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदवून भारताचे आव्हान 3-1 असे संपुष्टात आणले.
या हॉकी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5-1 अशा गोलफरकाने पराभव केला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 4-2 अशी मात केली होती. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले होते. आता या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा हॉकी सामना शनिवारी येथे खेळवला जाणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List