दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी मोठं षडयंत्र; आम आदमी पार्टीचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल हे तुरुंगात आहेत. अशातच आम आदमी पार्टीने एक मोठा दावा केला आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येणार असल्याचा आरोप दिल्ली सरकारमधील मंत्री आणि ‘आप’च्या नेत्या अतिषी यांनी केला आहे.
‘जनतेने निवडून दिलेल्या दिल्ली सरकार विरोधात मोठे षडयंत्र सुरू आहे. येत्या काही दिवसांत केंद्र सरकार दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करणार आहे. सूत्रांकडून आम्हाला पक्की माहिती मिळाली आहे’, असा आरोप अतिषी यांनी केला आहे.
‘गृह मंत्रालयाकडून दिल्ली सरकारमध्ये IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असते. पण आता अशा नियुक्त्या करणं बंद झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिल्लीत पोस्टींग होत नाहीहेत. अनेक विभाग रिक्त आहेत. तिथे अधिकारीच नाहीत. यावरून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत मिळत आहेत’, असा दावा अतिषी यांनी केला आहे.
‘दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना हे काही कारण नसताना गृह मंत्रालयाला पत्र लिहीत आहेत. सरकार चालत नाहीये. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खासगी सचिवांनाही विनाकारण हटवण्यात येत आहे. हे सर्व संकेत दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे आहेत. अरविंद केजरीवाल सरकार विरोधात खूप मोठे राजकीय षडयंत्र रचले जात आहे’, असा गंभीर आरोप अतिषी यांनी केला.
‘दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करणं हे बेकायदेशीर असेल. दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांना बहुमत दिले आहे. 17 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेत मांडलेल्या विश्वादर्शक प्रस्तावावेळी बहुमत सिद्ध झाले आहे. यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या जवळ बहुमत आहे तोपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही. हा जनतेचा अपमान आहे’, असे अतिषी म्हणाल्या.
‘2016 मध्ये उत्तराखंडमध्ये असेच घडले होते. मात्र दिल्लीच्या जनतेने घाबरू नये. ही लढाई आम्ही रस्त्यावरून संसदेपर्यंत लढू. दिल्लीकरांचा हक्क हिरावू देणार नाही. दिल्लीच्या महिलांना 1000 रुपये महिना दिला जाईल’, असे अतिषी यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List