केवायसी अपडेटच्या नावाने कर्जाचा झोल; बिहारमधील दोघा भामट्यांना बेड्या, काळाचौकी पोलिसांची कारवाई
केवायसी अपडेट करण्याचा बहाणा करत एका तरुणीला सायबर भामट्यांनी गंडा घातला आहे. केवायसी अपडेटच्या नावाने आरोपींनी तरुणीची माहिती मिळवली आणि तिच्या खात्यावर वैयक्तिक कर्ज घेऊन फसवणुक केली. आरोपींनी शिताफिने इतका खटाटोप केला. पण काळाचौकी पोलिसांनी बिहार गाठून दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यात एका तरुणीचा सुद्धा समावेश आहे.
चिंचपोकळी येथे राहणारी तनिषा चौहान (24) या तरुणीला तिच्या व्हाँट्स्अपवर एका अज्ञात नंबरवरून एक्सिस बँक एपीके फाईल आली. त्यानंतर आरोपीने तिला कॉल करून तो एक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे केवायसी आजच्या आजच अपडेट करावे लागणार असे सांगत तनिषाची वैयक्तिक माहिती लिंकमध्ये भरून घेतली. मग त्या माहितीच्या आधारे तनिषाच्या बँक खात्यावर वैयक्तिक कर्ज घेतले. अशा प्रकारे सायबर गुन्हेगाराने तनिषाची तीन लाख 12 हजाराची फसवणुक केली. हा प्रकार तनिषाच्या लक्षात येताच तिने काळाचौकी पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, सायबर अधिकारी शितल माने तसेच चंद्रशेखर परब, सुभाष रासवे या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक बाबींचा पोलिसांनी अभ्यास केला असता आरोपी बिहार राज्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथक बिहारला रवाना झाले आणि तेथील दुर्गम भागात जाऊन लपलेल्या अमित कुमार मालाकार (24) आणि राणीदेवी पासवान (27) या दोघांना पकडून आणले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List