नगर अर्बन बँक फसवणूकप्रकरणी 8 हजार पानी दोषारोपपत्र

नगर अर्बन बँक फसवणूकप्रकरणी 8 हजार पानी दोषारोपपत्र

 

नगर अर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या संचालक, अधिकारी व कर्जदार अशा दहाजणांविरोधात सखोल तपास करून नगर आर्थिक गुन्हे शाखेने आज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे, अशी माहिती तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली. सुमारे 8 हजार पानांच्या या दोषारोपपत्रात अटक करण्यात आलेल्या 10 आरोपींच्या गुह्याचे पुरावे, व्यवहारांची माहिती व फॉरेन्सिक अहवालाचा समावेश असल्याचे भारती यांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींच्या अटकेला 90 दिवसांचा कालावधी पूर्ण होण्याच्या आतच आर्थिक गुन्हे शाखेमार्फत न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले आहे.

भाजपचे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांच्या अधिपत्याखाली नगर अर्बन बँकेचे कामकाज सुरू होते. त्यांच्या अधिपत्याखालील संचालक मंडळाने गैरकारभार केला होता. त्यामुळे बँकेची चौकशी व्हावी, अशी मागणी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्यासह पोपट लोढा, अच्युत पितळे, राजेंद्र चोपडा यांनी केली होती. शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या बँकेला त्यांच्या काळात घरघर लागल्याचे बोलले जात होते. बँकेचा कारभार मनमानी पद्धतीने हाकल्यामुळेच बँक डबघाईला गेली. आता बँक बंद झाली असून, यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या ठेवी अडकलेल्या आहेत.

माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. या संपूर्ण घोटाळ्याचे पोलिसांनी फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले आहे. यात प्रथमदर्शनी 105 जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यात सुमारे 291 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. आरोपींपैकी 10 जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात संचालक मनेष दशरथ साठे, अनिल चंदुलाल कोठारी, अशोक माधवलाल कटारिया, सीए शंकर घनश्यामदास अंदानी, बँक अधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील, राजेंद्र शांतीलाल लुणिया, मनोज वसंतलाल फिरोदिया, कर्जदार प्रवीण सुरेश लहारे, अविनाश प्रभाकर वैकर, अमित वल्लभभाई पंडित यांचा समावेश आहे.

राजेंद्र गांधी यांच्या अधिपत्याखाली ‘नगर अर्बन बँक बचाव समिती’ स्थापन करण्यात आली होती. त्याचा कारभार चांगल्या पद्धतीने सुरू होता. त्यामुळे बँकेचे व्यवहार कशा पद्धतीने झाले, हे यातून सिद्ध झालेले होते व याचा फायदा प्रशासनाला तपासामध्ये झाला होता. विशेष म्हणजे गांधी यांनी फक्त स्थानिक पातळीवर नव्हे, तर दिल्लीच्या कार्यालयालासुद्धा तक्रारी देऊन भ्रष्टाचाराबाबत लक्ष वेधले होते.

बोगस सोन्याबाबत स्वतंत्र तक्रार

n बँकेतील कर्ज प्रकरणांमध्ये कर्जदारांकडून कर्जाच्या रकमेचा गैरवापर, तसेच कर्जाच्या रकमेतून जुन्या कर्जाच्या रकमा भरणे, काही रक्कम संचालक अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले आहे. तसेच बँकेच्या शाखांतर्गत व्यवहारासाठी असलेल्या खात्यांमधून कर्जदारांच्या खात्यांमध्ये रकमा वर्ग झाल्याचेही तपासात समोर आले आहे. फॉरेन्सिक अहवालात अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले असून, या सर्वांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासणीत शेवगाव तालुक्यामध्ये बँकेच्या शाखांमधून सुमारे 300हून अधिक पिशव्यांमध्ये बोगस सोने निघाले आहे. त्याची स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याची चौकशी करून अहवाल तयार करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;