शेततळ्यात बुडून बहीणभावाचा मृत्यू; सांगोल्यातील घटना
शेततळ्यात पोहताना बुडणाऱया लहान भावाला वाचविण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या बहिणीचाही मृत्यू झाल्याची घटना सांगोला तालुक्यातील राजुरी (कुटे वस्ती) येथे घडली. प्रतीक्षा आबा कुटे (वय 11), ओम आबा कुटे (वय 7) अशी मयत बहीण-भावाची
नावे आहेत.
राजुरी येथील आबा कुटे यांच्या घरापासून काही अंतरावर शेततळे आहे. उन्हाळ्यामुळे कुटे वस्ती येथील काही मुले जवळच विहिरीत पोहत होती. त्यावेळी प्रताक्षा आणि ओम विहिरीच्या काठावर बसले होते. परंतु, त्यांना पोहता येत नसल्याने पोहणाऱया मुलांनी त्यांना घराकडे पाठविले. परंतु, ओमला पोहण्याचा मोह आवरला नसल्याने तो आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या नारायण कुटे यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी उतरला. पण, पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. हे पाहताच प्रतीक्षाने त्याला वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी घेतली; परंतु तिलाही पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात बुडाले. बराच वेळ होऊनही मुले घरात न दिसल्याने त्यांच्या आई व आजीने शेजारील मका पिकात त्यांचा शोध घेतला. त्यानंतर सुमारे एक तासाने ओमचे कपडे व सँडल नारायण कुटे यांच्या शेततळ्याच्या कडेला दिसून येताच, आई व आजीने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून रामचंद्र कुटे व बाबासाहेब कुटे यांनी धाव घेत शेततळ्यातून दोघांना बाहेर काढले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृतघोषित केले.
प्रतीक्षा ही नाझरे येथील श्रीधर कन्या प्रशाला इयत्ता पाचवीत शिकत होती. ती वार्षिक परीक्षेचा पेपर देऊन घरी आली होती. ओम कुटे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होता. तो ही शाळेतून घरी आला होता. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List