‘सामना’समोरील राणेंची सभा उधळल्याप्रकरणी शिवसैनिक निर्दोष
2005 मध्ये शिवसेनेशी गद्दारी केलेल्या नारायण राणे यांची दै. ‘सामना’ कार्यालयासमोरील सभा उधळल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने बुधवारी शिवसैनिकांची निर्दोष सुटका केली. साक्षीदारांच्या जबाबात विसंगती तसेच आंदोलक शिवसैनिकांविरुद्ध सबळ पुरावे नाहीत, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने 28 शिवसैनिकांना निर्दोष ठरवले.
शिवसेनेशी गद्दारी केलेल्या नारायण राणेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्याचवेळी 24 जुलै 2005 रोजी राणेंनी प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयासमोर सभा आयोजित केली होती. यादरम्यान शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. त्याप्रकरणी शिवसैनिकांविरुद्ध दादर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. त्या आंदोलनाचा खटला विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे चालला. मागील वर्षभरात या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन बुधवारी न्यायालयाने सर्व 28 शिवसैनिकांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. साक्षीदारांच्या जबाबात विसंगती आहेत. तसेच आरोप सिद्ध करणारे सबळ पुरावे नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणात शिवसैनिकांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अनिल पार्टे, अॅड. गिरीश सावंत, अॅड. राहुल रोकडे यांनी बाजू मांडली, तर अॅड. मेराज शेख, अॅड. प्राची पार्टे यांनी खटल्यात सहकार्य केले.
निर्दोष ठरलेले शिवसैनिक
अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, अजय चौधरी, दगडू सकपाळ, किरण पावसकर, सूर्यकांत महाडिक, श्रद्धा जाधव, हरीश वरळीकर, रवींद्र वायकर, विशाखा राऊत, सुहास पाटील, विनायक देवरुखकर, सदानंद परब, सूर्यकांत बिर्जे, अशोक केळकर, मनोहर सावंत, प्रवीण शेटये, मनोहर कांबळी, महेश सावंत, ज्योती भोसले, स्वाती शिंदे, इंदुमती माणगावकर, अजित कदम, स्नेहल जाधव, प्रीती देव्हारे, मंगेश भाटकर, प्रकाश पवार या 28 शिवसैनिकांना निर्दोष ठरवले. दत्तात्रय नलावडे यांचे खटला प्रलंबित असतानाच निधन झाले होते. त्यामुळे त्यांचे नाव वगळण्यात आले होते.
नेमके काय घडले होते?
शिवसेनेशी गद्दारी केलेल्या नारायण राणेंविरुद्ध शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. त्याच पार्श्वभूमीवर संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या सभेजवळ निदर्शने केली होती. त्यावेळी दोन गटांत धक्काबुक्की झाली होती. याप्रकरणी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह एकूण 29 जणांविरुद्ध दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List