केंद्रात 10 वर्ष सत्ता असताना नरेंद्र मोदींना एससी, एसटी, आदिवासी समाजाची आठवण का झाली नाही ? : नाना पटोले.

केंद्रात 10 वर्ष सत्ता असताना नरेंद्र मोदींना एससी, एसटी, आदिवासी समाजाची आठवण का झाली नाही ? : नाना पटोले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुका आल्या की दलित, आदिवासी, ओबीसी, गरिब लोकांची आठवण येते. 10 वर्षात या समाजासाठी मोदी सरकारने काहीही केलेले नाही. 10 वर्षात या समाज घटकांवर अनन्वित अत्याचार केले गेले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मोदी सरकारमुळेच गेले आहे. आदिवासींच्या जमिनी हिरावून घेऊन उद्योगपतींच्या घशात घातल्या, गरिबांना अधिक गरिब बनवले आणि लोकसभेच्या निवडणुका सुरु झाल्या की एससी, एसटी, आदिवासी समाजाची आठवण झाली का ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेक येथील प्रचार सभेत काँग्रेस व इंडिया आघाडीवर केलेल्या आरोपाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, 10 वर्षात एससी, एसटी, आदिवासी समाजाचा विकास केला हा मोदींचा दावा खोटा आहे. उलट मोदी सरकारने मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांच्या बजेटमध्ये कपात केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. आदिवासी समाजाच्या महिलेला राष्ट्रपती केल्याचे सांगताना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घटनापासून वंचित ठेवले, अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यापासून वंचित ठेवून देशाच्या राष्ट्रपती, महिला व आदिवासी समाजाचा अपमान केला असताना कोणत्या तोंडाने नरेंद्र मोदी आदिवासींचा सन्मान केला असे सांगतात. गरिब समाजाला विकासाचा लाभ पोहचला असता तर 80 कोटी जनतेला 5 किलो मोफत रोशन द्यावे लागले नसते. 5 किलो मोफत धान्य देऊन 10 वर्ष एससी, एसटी, आदिवासी व गरिब लोकांची मोदी सरकारने महागाई करुन प्रचंड लुट केली, या समाजाला जगणे कठीण करुन ठेवले आहे.

नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा आपण गरिब समाजातून आल्यानेच विरोधक आपल्याला शिव्या देतात असे सांगून सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु 20 लाख रुपयांचा सूट, 3 लाखांचा चष्मा, 1.5 लाखांचा पेन आणि 8 हजार कोटींचे विमान वापरणारे नरेंद्र मोदी गरिब कसे? हा प्रश्न देशातील गरिब जनतेला पडला आहे, अशी गरिबी या समाजाला का लाभली नाही? याचे उत्तर मोदींनी दिले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारण काँग्रेसने संपवले हा नरेंद्र मोदी यांचा आरोपही खोटा व दिशाभूल करणारा आहे. भाजपाची मातृसंस्था आरएसएसला संविधान, देशाचा तिरंगा झेंडा पहिल्यापासूनच मान्य नाही. संविधान बदलण्याची भाषा संघ परिवार व भाजपाचे नेतेच सातत्याने करत असतात. लोकसभा निवडणुका सुरु होताच अनंतकुमार हेगडे या भाजपा नेत्याने 400 पार चे बहुमत आले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार हे जाहीरपणे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागारानेही संविधान बदलले पाहिजे असे स्पष्ट केले आहे, असे असताना संविधानावरुन काँग्रेसवरच आरोप करणे हे पंतप्रधान मोदी व भाजपाला शोभत नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

मागील 10 वर्षातील मोदी सरकारचा कारभार हा शेतकरी, कामगार, महिला, तरुणवर्ग यांना उद्ध्वस्थ करणारा ठरला आहे. देशात 40 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आहे, मोदी सरकारने नोकर भरती केली नाही तरुणांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही आणि 10 वर्ष हा तर ट्रेलर आहे असे म्हणतात, पण हा ट्रेलरच जनतेला देशोधडीला लावणारा असेल तर जनता पुन्हा भाजपा व एनडीएला मते कशाला देईल. १० वर्षातील मोदी सरकारच्या पापाची शिक्षा जनता या लोकसभा निवडणुकीत देऊन त्यांना घरी बसवेल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;