राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिल्याने मनसेमध्ये नाराजी, नेत्यानं पोस्ट शेअर करत दिला राजीनामा
मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मनसेच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले आणि सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकजण नाराज झाले आहेत. अशातच आता मनेसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांना ही गोष्ट खटकली आणि त्यांनी थेट राजीनामा देत फेसबुकवर भलीमोठी पोस्ट शेअर करत मनसेला कायमचा रामराम केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र मंगळवारी मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी बिनशर्त महायुतीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आणि चर्चांना पूर्णविराम लागला. त्यांच्या या भूमीकेमुळे त्यांच्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मध्येही नाराजीचा सूर पसरला. त्यानंतर मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी ‘मनसे अलविदा’ अशी पोस्ट शेअर करत मनसेला रामराम केला. कीर्तिकुमार शिंदे यांची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत असून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी सरचिटणीस पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कीर्तिकुमार शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मनातली खदखद मांडली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत पक्षाचा राजीनामा दिला आहे. हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.
”अलविदा मनसे!
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप- शिंदेगट- अजित पवारगट’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त नी फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे…’ अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक ‘अनाकलनीय’ वर्तुळ पूर्ण झालं.
पाच वर्षांपूर्वी 2019 लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर- ‘लाव रे तो व्हिडिओ’ सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप- मोदी- शाह यांच्या विरोधात जे तथ्य- विचार मांडत होते त्यांबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो.
आज 5 वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय?
गेल्या 10 वर्षांत, त्यातही विशेष करून मागच्या 5 वर्षांत ‘भामोशा’ने देशाचं अक्षरशः वाटोळं केलं आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करत सत्तेवर येऊन ‘भामोशा’ अपारदर्शक हुकूमशाहीने दडपशाही करत आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या चौकशांचा ससेमिरा पाठीमागे लावून भाजपेतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना गजाआड पाठवण्याची भीती दाखवून वॉशिंग मशीनमध्ये घालून त्यांचे शुद्धीकरण करून त्यांचे ‘भामोशा’मध्ये सक्तीने पक्षांतर करवून घेतले जात आहे. ‘भामोशा’चे विचार ज्यांना पटतात ते राष्ट्रप्रेमी किंवा हिंदू, आणि ‘भामोशा’च्या विरोधात आहेत ते राष्ट्रद्रोही किंवा अहिंदू! या नव्या समीकरणामुळे जातपातधर्माच्या नावाखाली माणसाला माणूसपणापासून तोडण्याचे काम सुरू आहे. अत्यंत नम्रपणे सांगतो की, प्रबोधनकारांची अनुपलब्ध पुस्तके प्रकाशित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्याला ‘भामोशा’चं असलं राष्ट्रीयत्व- ‘हिंदुत्व’ मान्यच होऊ शकत नाही.
राजसाहेब ठाकरे यांनी ‘भामोशा’ची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं, पण त्यातून महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही.
खरं तर असे अनेक मुद्दे राजसाहेबांशी भेटून बोलायचे होते. पण ते शक्य नाही! त्यामुळे हा प्रवास इथेच थांबवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीसपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List