कोंढापुरी येथील पाझर तलावातील पाणीसाठा तळाला; पाणी आवर्तनाची प्रतीक्षा
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलावातील पाणीसाठ्यात प्रचंड घट झाली असून तलावातील पाणीसाठा तळाला गेला आहे. चासकमान धरणातील पाण्याचे आवर्तन या पाझर तलावात कधी येईल या प्रतिक्षेत परिसरातील शेतकरी आहेत. कोंढापुरी येथील पाझर तलाव गावचे कुलदैवत खंडोबा मंदिराशेजारी असून या पाझर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे.
सुमारे पावणेचार दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमतेच्या या पाझर तलावातील पाण्याचा उपयोग कोंढापुरी, कासारी, निमगाव म्हाळुंगी,खंडाळे, गणेगाव खालसा, पिंपरी दुमाला शिवारातील शेतक-यांच्या शेतातील पिकांना होत आहे. कोंढापुरी गावापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिक्रापूर तसेच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती गावातील नागरिकांसाठीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविलेली आहे. या पाझर तलावातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठीही होत आहे. या पाझर तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी शेतात आडसाली ,खोडवा ऊसही ठेवला असून भेंडी पिकही शेतात घेतले आहे. जनावरांसाठी गिन्नी गोल ,घास ,कडवळ ही पिकेही शेतात केली आहेत. सध्या या परिसरात दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढू लागली असून उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे या पाझर तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. पिकांना पाझर तलावातील पाण्याची अधिक गरज असल्याने या पाझर तलावातील पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरी चासकमान धरणातील पाण्याच्या आवर्तनाच्या प्रतिक्षेत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List