मोदींची मुक्ताफळे… म्हणे, बाळासाहेबांची शिवसेना नकली; महाराष्ट्रात संतापाची लाट
विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग केल्यानंतर प्रचाराच्या नावाखाली अत्यंत खालची पातळी गाठताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच टीका केली आहे. मोदी यांनी चंद्रपूरमधील सभेत बोलताना ‘बाळासाहेबांची शिवसेना नकली’ असल्याची मुक्ताफळे उधळली आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून मोदी आणि भाजपचा तीव्र निषेध केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना देशभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये ‘इंडिया’ आघाडीने प्रचारांत प्रचंड आघाडी घेतल्याने सर्वाधिक खासदार असलेल्या भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांचे बडे नेतेही बेताल वक्तव्य करून विरोधकांची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये खुद्द नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन थेट शिवसेनाप्रमुखांवरच टीका केल्याचे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. ‘इलेक्टोरल बाँड’सारखी शिवसेना विकत घेता येत नाही. ईडी अँड बीडीच्या भीतीने जे गेले ते शिवसैनिक कधीच होऊ शकत नाहीत. लाखो कट्टर शिवसैनिक आज ‘शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे ’सोबत निष्ठsची मशाल पेटवून सज्ज आहे’, असा इशारा सोशल मीडियावर भाजपला अनेकांनी दिला आहे.
मोदी, नकली चाणक्य…
मोदींच्या वक्तव्याचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. ‘शिवसेना हा ज्वलंत आणि प्रखर विचार असून तो इलेक्टोरल बाँडसारखा विकत घेता येत नाही,’ असे बजावत मोदींना ‘नकली चाणक्य’ असल्याचा टोला लगावला आहे. ‘तुम्हाला शिवसेनेवर बोलण्याचा कोणताही हक्क नाही,’ अशा शब्दांत दटावलेही आहे.
गुजरात्यांनी शिवसेनेबद्दल बोलूच नये
मराठी माणूस आणि मशाल चिन्ह असलेल्या ‘एक्स’वरील एका अकाऊंटवर ‘गुजरातीयों को मराठी लोकाsंगे शिवसेना के बारे मे बोलने का कोई हक्क नही…’ अशी पोस्ट केली आहे.
शिवसेना कधीही संपणार नाही
पुण्यातील अशरुझ नावाच्या एका ‘एक्स’ अकाऊंटवर तर ‘ज्यांना शिवसेना संपवायची होती ते संपतील, पण शिवसेना काही संपणार नाही. शिवसेना विकत घेता येत नाही. जितका ठाकरेंवर वार करतील त्यापेक्षा जास्त उलटणार…’ असा इशाराच दिला आहे.
शिंदेंना गुडघ्यावर आणले
नकली शिवसेना कोणती? असा प्रश्न करत एका तरुणीने ‘ंशिंदेंना गुडघ्यावर आणले, सीटिंग खासदारांना तिकीट मिळत नाही आणि ज्या जागा मिळतात त्यावर भाजप उमेदवार ठरवतो’ असे म्हटले आहे.
मोदींना पाडायचंच!
‘सिद्धू’ नावाच्या एका अकाऊंटवर शिवसेनाप्रमुखांचा फोटो आहे. ‘तिरंगा हमारी शान है, भगवा हमारी जान है… शिवसैनिक… मराठी माणूस… जय महाराष्ट्र’ असे स्टेटस आहे. मोदींनी केलेल्या वक्तव्यावर अतिशय कडक शब्दांत उत्तर दिले आहे. प्रत्येक ठिकाणी मोदीच उमेदवार आहे आणि मोदींनाच पाडायचं आहे. एकनिष्ठ शिवसैनिक पेटून उठला आहे,’ असा इशारा दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List