बायकोकडून पोटगी मागण्याचा नवऱ्याला हक्क, हायकोर्टाचा निकाल
महिलांप्रमाणे पुरुषांनाही पोटगी मागण्याचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. आजारपण वा अन्य कारणामुळे उत्पन्न कमावण्यास सक्षम नसलेल्या बेरोजगार पतीला कमावत्या पत्नीकडून पोटगी मागण्याचा कायदेशीर हक्कच आहे, असे स्पष्ट करीत न्यायालयाने कल्याणच्या बेरोजगार पतीला दरमहा 10 हजार रुपयांची पोटगी मंजूर केली.
संसारात मतभेद झाल्यानंतर पतीने विवाहसंबंध संपुष्टात आणण्यासाठी कल्याणच्या न्यायालयात धाव घेतली. यादरम्यान पतीसह पत्नीने परस्परांकडे पोटगी मागत अर्ज केले. यापैकी पत्नीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला, तर पतीचा अर्ज मंजूर केला. आजारपणामुळे कमाई करण्यास सक्षम नसलेल्या पतीला कमावत्या पत्नीने दरमहा 10 हजार रुपयांची अंतरिम पोटगी द्यावी, असा आदेश कल्याणच्या न्यायालयाने दिला. सहदिवाणी न्यायाधीशांनी 13 मार्च 2020 रोजी दिलेल्या या आदेशाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी पत्नीचे अपिल फेटाळले आणि पतीला पोटगी देण्याचा कल्याण न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
आजारपणामुळे पतीचा दावा मान्य
या प्रकरणातील पती आजारपणामुळे कोणत्याही प्रकारे उत्पन्न कमावण्यास सक्षम नाही. मात्र पत्नी चांगल्या पगाराच्या नोकरीतून पुरेसे उत्पन्न कमावण्यास सक्षम आहे. त्यामुळे या कमावत्या पत्नीकडून पोटगी मागण्याचा बेरोजगार पतीला कायदेशीर हक्क आहे, असे उच्च न्यायालयाने नमूद केले.
– पोटगी मागणाऱ्या पतीने शारीरिक अपंगत्व वा आजारपणामुळे तो स्वतःचा सांभाळ करण्यास आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसल्याचे सिद्ध केले पाहिजे. त्याचवेळी पोटगीचा दावा मान्य होऊ शकतो.
नोकरीच्या राजीनाम्यानंतरही पोटगी देण्यापासून सुटका नाही
वैवाहिक वादाचा खटला प्रलंबित असतानाच पत्नीने अॅक्सिस बँकेतील शाखा व्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नोकरी नसल्याचे तसेच मुलांचा खर्च व कर्जाच्या हप्त्यांचा भार असल्याचे सांगून पत्नीने पोटगीची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र नोकरी गेल्यानंतरही ती मुलांचा खर्च व गृहकर्जाच्या हप्त्यांचा भार पेलत आहे. यावरून तिचे उत्पन्नाचे इतर स्रोत असल्याचे स्पष्ट होते. पत्नीने तिच्या इतर उत्पन्न स्रोतांचा उलगडा करणे आवश्यक आहे, असे नमूद करीत न्यायालयाने अपिलकर्त्या पत्नीला पोटगी देण्याच्या जबाबदारीपासून सूट देण्यास नकार दिला.
न्यायालयाची निरीक्षणे
– हिंदू विवाह कायद्याच्या कलम 24 च्या तरतुदींमध्ये ‘जोडीदार’ हा शब्द वापरला आहे. ‘जोडीदार’च्या व्याख्येत पती आणि पत्नी या दोघांचाही समावेश होतो.
– स्वतःचा सांभाळ करू न शकणाऱया पती वा पत्नीला सक्षम जोडीदाराने खटला प्रलंबित असताना अंतरिम पोटगी दिली पाहिजे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List