भरदिवसा रस्त्यात अडवून महिलेला लुटले, कवठे येमाई येथील घटना
शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाईच्या इनामवस्ती रोडने देवदर्शन करून पायी घरी चाललेल्या महिलेला दुचाकी वरून आलेल्या तीन अज्ञात चोरटयांनी अडवून लुटण्याचा प्रकार आज चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. घाबरलेल्या महिलेने आपले चुलत भाऊ दत्तात्रय शिवराम भोर यांना घडलेला प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तात्काळ शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांना या घटनेची माहिती दिली.
या घटनेबाबत प्रत्यक्ष द्वारकाबाई शंकर भोर (50) रा.गणेशनगर,इनामवस्ती कवठे येमाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आज मंगळवार असल्याने ग्रामदैवत श्री येमाई देवीचे दर्शन घेऊन गावातून तीन किमी अंतरावर गणेशनगर येथे असलेल्या आपल्या घरी रस्त्याने पायी चालल्या होत्या. सकाळी साडेदहाच्या दरम्यान बेंदाड ओढ्यानजीक मागून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी द्वारकाबाई यांना एकटे पाहून गाडी वळवली एकाने त्यांचा हात धरला तर दुसऱ्याने त्यांच्या गळयातील एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावली. त्यांच्या हातातील पिशवी खाली पडली ती देखील चोरट्यांनी लांबवली. त्यात महिला बचत गटाची 10 बचत पुस्तके, 10 महिलांची आधारकार्ड असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान त्याच रस्त्याने घरी चाललेले कवठे सोसायटीचे माजी चेअरमन विक्रम इचके यांनी काहीतरी वेगळे घडतेय हे पाहून त्यांनी गाडीवरून उतरून चोरट्यांच्या दिशे दगड फेकला. पण त्या गरबडीत ते नजीकच्या मोठ्या दगडास थेसकाळल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली.दरम्यान चोरटयांनी कोयते काढले व तेथून दुचाकीवर पसार झाले.
दरम्यान घटनास्थळावर ज्ञान सुख फटांगडे,काशिनाथ सरोदे हे लगेचच पोहचले. माहिती मिळताच त्यांनी दुचाकीवरून चोरट्यांचा पाठलाग सुरु केला पण चोरटे वेगळ्याच रस्त्याने पसार झाल्याचे त्यांनी सांगितले. शिरूरचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर,पोलीस कॉन्स्टेबल दीपक पवार,पोलीस पाटील गणेश पवार तात्काळ घटनास्थळी दाखल होत असून घटनेचा अधिक तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List