हिंदू विवाहासाठी कन्यादान महत्त्वाचा विधी नाही, न्यायालयाचा निर्वाळा
हिंदू विवाह विधी पूर्ण होण्यासाठी कन्यादान हा महत्त्वाचा विधी नसल्याचा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. एका पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हिंदू विवाह संपन्न होण्यासाठी सप्तपदी हा महत्त्वाचा विधी असल्याचं म्हटलं आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाच्या न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. ही सुनावणी आशुतोष यादव या याचिकाकर्त्याने आपल्या सासरच्या मंडळीविरोधात केलेल्या वैवाहिक वादा संदर्भातील एका गुन्हेगारी खटल्याच्या पुनर्विचार याचिकेवर होती. या याचिकेद्वारे यादव यांनी या प्रकरणातील दोन साक्षीदारांना पुन्हा समन्स बजावण्याची विनंती सत्र न्यायालयासमोर केली होती. मात्र, सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
यादव याने केलेल्या युक्तिवादानुसार, त्याच्या पत्नीचं कन्यादान झालं होतं किंवा नाही, हे सिद्ध करण्यासाठी प्रतिवादींच्या साक्षीदारांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाने हिंदू विवाह अधिनियमाच्या कलम 7 चा दाखला दिला. ज्यात हिंदू विवाह संपन्न होण्यासाठी सप्तपदी हा मुख्य विधी अनिवार्य आहे. त्यानुसार, विवाहात कन्यादान झालं होतं किंवा नाही, हे गैरलागू असून ही विवाह संपन्नतेची अनिवार्य अट नाही. त्यामुळे यातील साक्षीदारांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्याची गरज नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट करून याचिका फेटाळून लावली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List