महाविकास आघाडी महाराष्ट्रात विजयाची गुढी उभारणार, जयंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी ही आज विजयाची मूहूर्तवेढ करतेय. आज सगळ्यांनी एकत्रित येऊन गेले काही दिवस ज्या काही चर्चा केल्या. त्याला पूर्णविराम देऊन पूर्ण ताकदीने सर्व घटकपक्ष एकत्रित येऊन आजपासून या निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात होणार आणि म्हणूनच आजचा शुभमूहूर्त निश्चितच महाराष्ट्राच्या विजयाची, इंडिया आघाडीची आणि महाविकास आघाडीच्या विजयाचा मूहूर्तवेढ करणारा ठरेल. ती विजयाची गुढी आजपासून उभी करू असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबईत नरीमन पाँइट येथील शिवालयात महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, अनेक महिने अनेक बैठकांमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सर्व मित्रपक्षांबरोबर चर्चा करत होती. देशात इंडिया आघाडीच्या काही बैठका झाल्या. त्यातूनही महाराष्ट्रातला हा अलायन्स व्हावा याबाबत दोन ते तीन वेळा इंडिया आघाडीत दिल्लीच्या स्तरावर चर्चा झाली. महाराष्ट्रातला अन्याय, महाराष्ट्रातली महागाई, महिलांवरील अन्याय, बेकारी गेले दहा वर्षे आपण पाहत आलोय. या सगळ्यातून आता बाहेर पडण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वांपुढे महाविकास आघाडीचा अलायन्स जाहीर करण्यासाठी इथे आलो आहोत असे ते म्हणाले.
जयंत पाटील पुढे म्हणाले, आम्ही अनेक पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. काहीठिकाणी यश आले काही ठिकाणी नाही आले. पण हे सगळे मागे टाकून आता जे आम्ही एकत्रित आलो त्यामध्ये आमच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष , समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, समाजवादी गणराज्य पक्ष आहेत. याव्यतिरिक्त अनेक संघटना आहेत. ज्या रिपल्बिकन विचाराच्या, आंबेडकरी विचारांच्या आहेत अशा अनेक संघटना महाविकास आघाडीशी जोडलेल्या आहेत असेही ते म्हणाले. सगळ्यांच्या वतीने जी साधकबाधक चर्चा करुन निर्णय झाले ते आपल्यासमोर याठिकाणी मांडतोय. मला खात्री आहे येणाऱ्या निवडणुका पाच टप्प्यात होणार असून त्या पाचही टप्प्यात तुम्हा सर्वांचे सहकार्य आम्हाला याचपद्धतीने लाभेल आणि आमचे विचार महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम हे देखील तुम्ही प्रभावीपणे कराल असा विश्वास बाळगतो असे जयंत पाटील म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List