महाराष्ट्रातील साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठीच आजचा दिवस निवडला; संजय राऊत यांचा टोला
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. राज्यातील साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठीच हा साडेतीन मुहूर्तापैकी एक निवडण्यात आला आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची एकजूट दिसून येईल, ती एकजूट कायम राहील. तसेच महाविकास आघाडी राज्यात लोकसभेच्या 35 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. काही लोकांचे मिशन आहे. ते 48 पैकी 48 किंवा 45 प्लसच्या घोषणा करत आहेत,असा टोला लगावत आम्ही 35 पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. म्हणजे 40,45 कितीही जागा मिळू शकतात, मात्र 35 जागा नक्की आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आजचा दिवस आपल्या संस्कृतीत महत्त्वाचा आहे. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मानला जातो. सध्या राज्याच्या राजकारणात साडेतीन शहाणे आहेत. त्या साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आम्ही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा मुहूर्त निवडला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि आमच्या घटक पक्षात कोणतेही वाद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आघाडीत एखाद्या जागेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा होत असतात, ते अपेक्षितही आहे. एखादी जागा एखादा पक्ष अनेक वर्षे लढवत असतो. तेथील कार्यकर्त्यांच्या भावनाही असतात. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या सांगलीकर नेत्यांच्या भावनांशी आपण सहमत आहोत. आम्ही काँग्रेससाठी सोडलेल्या जागेवरील शिवसैनिकांच्या भावनांशीही आपण सहमत आहोत. मात्र, आता देशात हुकूमशाहीविरोधात लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, असेही संजय राऊत म्हणाले.
निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आचारसंहितेच्या काळात कोणीही पंतप्रधान, मुख्यमंत्री नसतो. तरीही मोदी स्वतःला पंतप्रधान म्हणवत आहेत. आचारसंहितेच्या काळात कोणीही व्यक्ती पदावर नसतो. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना खोटी आहे, असे पंतप्रधान म्हणत असतील, तर त्यांना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची किती भीती वाटते, ते स्पष्ट होते, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला. अनेक कुटील डाव टाकत, पक्ष फोडूनही अनेक वादळाशी सामना करत उद्धव ठाकरे मोदी आणि शहा यांना आव्हान देत दीपस्तंभासारखे उभे आहेत. त्यामुळे अमची शिवसेना खोटी आहे, असे म्हणणे हाच नकली विचार आहे, असेही त्यांनी ठणकावले. अशा प्रकारची भाषणे मोदी यांनी महाराष्ट्रात केली पाहिजे, ते जिथे जातील, तेथील भाजपची जागा कमी झाल्याशिवाय राहणार नाही. असली काय आणि नकली काय, याचा निकाल आता जनताच करणार आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे विरुद्ध नरेंद्र मोदी, धर्म विरोधात अधर्म, दहपशाही विरोधात प्रामाणिकपणा, हुकूमशाही विरोधात लढणारा अर्जुन आणि ईडी, सीबीआयचा वापर करणार खंडणीखोर नेता अशी लढाई होत आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्याप्रकारची टीका करत आहेत, त्यातून ते उद्धव ठाकरे यांच्यासमोर लटपटत आहेत, त्या भीतीतूनच ते अशी वक्तव्ये करत आहे, असा खरपूस समाचारही संजय राऊत यांनी घेतला. पंतप्रधान मोदी सरकारी यंत्रणांचा, सरकारी हेलिकॉप्टर वापरत प्रचारदौरे करत आहेत, हा आचारसंहितेचा भंग आहे. वर्षावर निवडणुकांसाठी होणाऱ्या बैठका आणि घोषणा हादेखील आचारसंहितेचा भंग आहे. जे संविधान आणि घटना मानत नाहीत, तेच अशाप्रकारचे काम करू शकतात, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List