रात्रीचा रेल्वेप्रवास नको गं बाई… सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती
कामानिमित्त दररोज लाखो नोकरदार महिलांना मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमधून प्रवास करावा लागतो. मात्र, महिलांसाठी लोकल प्रवास खरंच सुरक्षित आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झालाय. याचे कारण म्हणजे, रात्रीच्या वेळी लोकलमधून प्रवास करणे आपल्याला असुरक्षित वाटत असल्याची खंत महिला प्रवाशांनी नुकत्याच एका सर्वेक्षणादरम्यान बोलून दाखवली.
मुंबई उपनगरी रेल्वेच्या महिला प्रवाशांचे अनुभव, समस्या, शिफारशी याबाबत आढावा घेण्यासाठी रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाने 1 ते 31 मार्च या कालावधीत महिला प्रवाशांचे सर्वेक्षण केले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत 21 ऑनलाइन प्रश्नावलीच्या सर्व्हेमध्ये जवळपास तीन हजार महिला प्रवाशांनी सहभाग घेतला.
n 40 टक्के महिलांनी रात्री 9 नंतर लोकलने प्रवास करणे असुरक्षित असल्याचे सांगितले. तर रात्री 11 नंतर लोकलमधील प्रवास असुरक्षित असल्याचे 42 टक्के महिला प्रवाशांनी म्हटले. 28 टक्के महिलांना रात्री 10 नंतरचा लोकल प्रवास सुरक्षित व्हावा, असे मत नोंदवले. महिला डब्यांचा आकार आणि रात्रीच्या प्रवासात महिला डब्यात वर्दीतील सुरक्षा वाढवणे, महिलांच्या डब्यातील भिकारी तसेच पुरुष फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी अशा शिफारसी महिला प्रवाशांनी केल्या आहेत.
तक्रारींसाठी पुढाकार नाही
रेल्वे प्रवास करताना एखादा गुन्हा घडल्यास केवळ 29 टक्के महिला तक्रार करण्यासाठी रेल्वे पोलीस ठाणे गाठतात. 64 टक्के महिला भीतीपोटी आणि 12 टक्के महिला लैंगिक गुह्यात लाजेखातर तक्रार करण्यास धजावत नाहीत. चोरीच्या बाबतीत मालमत्ता किंवा वस्तूची किंमत तक्रार करण्यासारखी नसल्याचे सांगत 12 टक्के महिला प्रवाशांनी तक्रार दाखल करत नाहीत, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List