केजरीवालांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यासाठी याचिका करणाऱयाला दिल्ली हायकोर्टाने फटकारले
अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करणारी तिसरी याचिका सुनावणीसाठी आल्यावर आज दिल्ली उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ही जनहितार्थ याचिका नसून स्व-प्रसिद्धी हितार्थ याचिका असल्याचे ताशेरे न्या. सुब्रमण्यम प्रसाद यांनी याचिकाकर्ते आपचे माजी आमदार संदीप कुमार यांची ही याचिका समोर आल्यावर मारले.
अबकारी कर घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केल्यामुळे केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकण्याचे आदेश हायकोर्टाने द्यावेत अशी मागणी संदीप कुमार यांनी केली होती. मात्र, अन्य दोन व्यक्तींनी केलेल्या अशाच प्रकारच्या दोन याचिका हायकोर्टाने आधी फेटाळल्यावरही ही याचिका केल्याबद्दल कोर्टाने संदीप कुमार यांना चांगलेच सुनावले. ही याचिका म्हणजे पब्लिसिटी इंटरेस्ट पीटीशन असल्याचा शेरा मारत, तुम्हाला न्यायालयीन खर्चासाठी भारीभक्कम दंड ठोठावायला हवा, असे कोर्टाने म्हटले.
यानंतर, अशाच स्वरुपाच्या दोन याचिका प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने फेटाळल्या असल्यामुळे हे प्रकरणही त्यांच्यासमोर पाठवण्याचे निर्देश न्या. सुब्रमण्यम यांनी दिले. आता 10 एप्रिल रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
ईडीकडून केजरीवाल यांच्या पीएची चौकशी
ईडीने अबकारी कर घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार आणि आपचे आमदार दुर्गेश पाठक यांची सोमवारी चौकशी केली. या प्रकरणी या दोघांची यापूर्वीही ईडीने चौकशी केली आहे.
केजरीवाल यांच्या आव्हान याचिकेवर आज निकाल
इडीने केलेल्या अटक कारवाईला आव्हान देत केजरीवाल यांनी केलेल्या याचिकेवर राखून ठेवलेला निकाल दिल्ली उच्च न्यायालय उद्या, मंगळवारी जाहीर करणार आहे. हायकोर्टाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या कामकाज यादीनुसार, न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा मंगळवारी दुपारी अडीच वाजता या प्रकरणी आदेश सुनावतील. केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेबरोबरच, इडीच्या कोठडीत ठेवण्याच्या आदेशालाही आव्हान दिले आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावरच अटक करण्याच्या खेळीलाही त्यांनी आव्हान दिले आहे. या सर्व घडामोडी घटनेच्या चौकटीचे उल्लंघन करणाऱया असल्याचा दावा त्यानी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List