Lok Sabha Election 2024 :‘वर्षा’वर प्रचाराच्या बैठका; मिंधेंना निवडणूक आयोगाची नोटीस
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सुरू असलेल्या राजकीय बैठकांची निवडणूक आयोगाने अत्यंत गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दोन अधिकाऱयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱयांना अशी नोटीस पाठवण्याची बहुतेक ही पहिलीच घटना आहे. ‘वर्षा’ बंगल्यावर होणाऱया राजकीय बैठकांच्या संदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करून निवडणूक आयोगाचे सर्वप्रथम लक्ष वेधले होते.
विधान भवनात जनता दरबार
विधान भवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या दालनात जनता दरबार भरवल्याची मध्यंतरी जिल्हा निवडणूक अधिकाऱयांकडे तक्रार करण्यात आली आहे. अध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग झाला असून तातडीने करावाई करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. यासंदर्भात चोक्कलिंगम यांना माध्यमांनी विचारले असताना अजून तक्रार आली नाही असे उत्तर दिले.
‘एक्स’च्या माध्यमातून तक्रार
देशात आचारसंहिता लागू होऊन आता दोन आठवडे उलटून गेले आहेत. तरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानावर सतत राजकीय बैठका होत आहेत. या बैठका तत्काळ थांबायला हव्यात. हा आचारसंहितेचा खुलेआम भंग आहे. निवडणूक आयोगाने याची अजून दखल घेतलेली नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी जागे आहेत का? कारवाई करा अशी मागणी सचिन सावंत यांनी ‘एक्स’द्वारे करीत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांना ‘टॅग’ केले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीएस अमोल शिंदे व उपसचिव नितीन दळवी यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवल्याचे समजते.
– राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना पत्रकार परिषदेत माध्यमांनी यासंदर्भात प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना चोक्कलिंगम म्हणाले की, या तक्रारी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली असून या नोटिशीला उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
– आयोगाने नेमक्या कोणत्या अधिकाऱयांना नोटीस बजावली आहे? या प्रश्नावर अधिक माहिती आपण मुंबई शहर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडून घ्या, असे सांगत चोक्कलिंगम यांनी अधिक माहिती देण्याचे टाळले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List