शिवसेना फोडून सत्तेत आलोय, काय काय भानगडी केल्यात आम्हालाच माहिती! गिरीश महाजनांच्या पोटातील सत्यही बाहेर आले
शिवसेनेकडून सत्ता हिसकावून घेताना काय काय भानगडी केल्यात ते आम्हालाच माहिती आहे. शिवसेना फोडून सत्तेत आलोय. राष्ट्रवादी काँग्रेसही आपणच फोडली. त्यामुळे ही सत्ता टिकवण्यासाठी आपल्याला फोडाफोडीचा म्हणजे महायुतीचा धर्म पाळावा लागेल… पीयूष गोयल, किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ शिष्टाई मंत्री गिरीश महाजन यांच्या तोंडून भाजपच्या सत्तालोलूपतेचे सत्य बाहेर पडले!
हिंगोलीतील भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांनी मिंधे गटाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या विरोधात रान उठवले. लावणीफेम हेमंत पाटील आम्हाला उमेदवार नको, अशी भूमिका या पदाधिकार्यांनी घेतली. त्यामुळे मिंध्यांवर हेमंत पाटलांची रवानगी यवतमाळ-वाशीम मतदारसंघात करण्याची नामुष्की आली. पण भाजपच्या तीन बंडखोरांनी उमेदवारी दाखल करून मिंध्यांची झोप उडवली. भाजपच्या बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी शिष्टाई मंत्री गिरीश महाजन, छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकिटासाठी वेटिंगवर असलेले केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि आमदार श्रीकांत भारतीय हे हिंगोलीत आले होते.
खोक्यांमुळे आमदार गळाला लागले
2019 मध्ये 105 आमदार निवडून येऊनही आपल्याला सत्ता मिळाली नाही. ती अडीच वर्षे भाजपने नुसती तळमळत काढली. शेवटी एकनाथ शिंदे यांच्या 40 आमदार गळाला लागले. शिवसेना फोडली तेव्हा कुठे सत्तेत येण्याचा आपला मार्ग मोकळा झाला, असे गिरीश महाजन भाजप पदाधिकार्यांसमोर बोलताना म्हणाले. शिंदे यांच्यानंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली. फोडाफोडीमुळेच आपण सत्तेत आहोत, असेही महाजन म्हणाले. सध्या संघटनात्मक बांधणी जोरात सुरू आहे. त्यामुळे राज्यातच काय, देशातही आपल्याला कुणाची गरज लागणार नाही, 2029 ची निवडणूक आपण स्वबळावर लढू अशी फुशारकीही महाजन यांनी पदाधिकार्यांसमोर मारली.
आम्ही शिंदे गटाचे काम करणार नाही
भाजपचे लोकसभा प्रमुख रामदास सुमठाणकर यांनी हेमंत पाटील आणि त्यानंतर देण्यात आलेल्या बाबूराव कदम कोहळीकर यांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली. पक्षाने सांगितल्यामुळे मी माघार घेत असलो तरी आम्ही कदमांचे काम करणार नाही, असे रामदास पाटील सुमठाणकर यांनी गिरीश महाजन यांना सांगितले. हेमंत पाटील आणि संतोष बांगर यांच्या गुंडगिरीमुळे जिल्ह्यातील भाजपचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आले आहे, त्याचे काय असा सवालही सुमठाणकर यांनी करताच महाजनांची बोलतीच बंद झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List